कल्याण : बँकेचे ऑनलाइन व्यवहार करत असताना कल्याण पश्चिमेतील रामबागेतील एका महिलेच्या बँक खात्यामधून एका भामटय़ाने नऊ व्यवहारांमधून तीन लाख सात हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने म. फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कल्याण पश्चिमेतील रामबाग गल्ली क्रमांक पाचमधील मनीषा सोसायटीत रिना समीर दत्ता (६१) या गृहिणी राहतात. बँक व्यवहारासाठी त्या स्टेट बँकेचे योनो उपयोजन वापरतात. ऑनलाइन व्यवहार करत असताना, रिना यांना मोबाइलवर आपला मोबाइल क्रमांक या जुळणीवर नोंदणीकृत करा, असा संदेश आला. बँकेकडून हा संदेश आला असेल म्हणून त्यांनी ती जुळणी (लिंक) उघडली. त्या जुळणीवर बँक अधिकाऱ्याचा मोबाइल क्रमांक दिसत होता. रिना यांनी त्यावर संपर्क साधला.
समोरील भामटय़ाने आपण ‘तुम्हाला एक जुळणी पाठवतो. ती फक्त उघडा. तुम्हाला जो ऑनलाइन व्यवहाराचा गुप्त संकेतांक (ओटीपी) येईल तो तुम्ही मला द्या. म्हणजे तुमचे योनो उपयोजन तात्काळ सुरू होईल’, असे सांगितले.
बँकेचा अधिकारी आपल्याशी बोलतोय असे वाटून रिना यांनी गुप्त संकेतांक समोरील भामटय़ाला दिला. त्यानंतर काही क्षणात रिना दत्ता यांच्या कॅनरा बँक, स्टेट बँकेमधील खात्यांमधून नऊ व्यवहारांमध्ये भामटय़ाने तीन लाख सात हजार रूपये काढून घेतले. या व्यवहारांचे लघुसंदेश रिना यांना मोबाइलवर आले. त्यांनी आपण पैसे काढण्याचे व्यवहार केले नसताना, पैसे काढले कोणी असा संशय आला. त्यांनी तात्काळ दोन्ही बँकांमध्ये धाव घेतली. तेथे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. मग त्यांनी पोलिसांत तक्रारी दिली. त्या आधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला. हे प्रकरण अधिकच्या तपासासाठी सायबर गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आले. स्थानिक पोलीस अधिकारी श्रीनिवास देशमुख, सायबर पोलीस या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three lakh online fraud woman online ganda getting otp online banking transactions police amy
First published on: 07-04-2022 at 01:22 IST