विद्युत् प्रवाह खंडित केल्यानंतर पुन्हा वीज जोडण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरण अभियानाच्या अंतर्गत सूट घेऊन पैशाचा भरणा केल्यानंतर वीज जोड़णी करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाकडे ५ हजाराची मागणी केली होती. त्यांना ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी संध्याकाळी लाचलुचपत खात्याच्या पथकाने पकडले. ठाण्यातील मॅक कंपनीजवळच्या महावितरण कार्यालयात या तिन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. तिघांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार रौनक खान (४० रा. भोलेनाथ नगर, शाईन अपार्टमेंट, मुंब्रा) हे आप या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. विजेचे बील न भरल्यामुळे त्यांच्या घरातील वीज प्रवाह खंडीत करण्यात आला होता. तसेच मीटर देखील काढण्यात आले होते. दरम्यान विद्युत वितरणाच्या विशेष मोहिमेअंतर्गत लाभ घेण्यासाठी रौनक यांनी ३८ हजार ७०० रुपयांचा भरणा केला. मात्र, मीटर बसविण्यासाठी खान यांच्याकडून महावितरणचे कर्मचारी गोसावी, पुणेकर आणि जाधव यांनी ५ हजाराची मागणी रौनक खान यांच्याकडे केली. पैसे नसल्याने दोन दिवसांनी देतो असे सांगून रक्कम ४ हजाराची निश्चित करण्यात आली. दोन दिवसानंतर महावितरणाच्या कार्यालयातून त्यांना फोन आला. यावेळी ३ हजार ५०० रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर रौनक यांनी लाचलुचपत खात्याच्या विभागाकडे तक्रार केली. या पथकाने बुधवारी दुपारी सापळा रचून ३ हजार ५०० रुपयांची लाच घेताना गोसावी, पुणेकर आणि जाधव याना अटक केली.