महापालिका प्रशासनाचा दावा
एकीकडे ठाणे शहरातून जाणाऱ्या राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गासह आसपासच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अवघे १४० खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर २४२२ खड्डे पडले होते. त्यापैकी २२८२ खड्डे आतापर्यंत बुजविण्यात आल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डय़ांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट करत हे खड्डे दोन दिवसात बुजविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
ठाणे शहरातून राज्य तसेच राष्ट्रीय महामार्ग जातात. त्याचबरोबर आसपासच्या शहरांना जोडणारे मार्गही आहेत. हे सर्वच मार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्डय़ांमुळे वाहतूक संथगतीने सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. महामार्ग तसेच आसपासच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या तुलनेत शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डय़ांचे प्रमाण कमी आहे. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडतात. यंदा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने जेट पॅचर मशीन घेतली असून त्याद्वारे शहरातील
खड्डे बुजविण्यात येत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील ५८८३ चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या रस्त्यांवर एकूण २४२२ खड्डे पडले होते. त्यापैकी ५६६६ चौ.मी. क्षेत्रफळ रस्त्यांवरील २२८२ खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित १७७ चौ.मी. क्षेत्रफळ रस्त्यावरील १४० खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक आहे. ठाणे महापालिकेची महापौर मॅरेथॉन स्पर्धा आठ दिवसांवर तर गणेशोत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पाश्र्वभूमीवर उर्वरित १४० खड्डे दोन दिवसात बुजविण्यात येणार आहेत.