स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, मतदानाचा हक्क बजावावा आदींसाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम, योजना राबवण्यात येत आहेत. ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येत असून, त्यासाठी येथील सर्व दुकाने, आस्थापने, निवासी हॉटेल, नाट्यगृहे, खानावळी, व्यापार, औद्योगिक उपक्रम, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे आदी ठिकाणच्या कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कामगारांना मतदानाच्या दिवशी देण्यात येणारी सुट्टी भरपगारी असणार आहे. कामगारांना सुट्टी न देणाऱ्या कार्यालयांवर दंडाची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, निमशासकीय कार्यालये, मंडळे आणि महामंडळांतील कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम १३५ ब प्रमाणे निवडणुकीच्या दिवशी आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांकडून कामगारांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. मतदानाच्या दिवशी सर्व कामगार मतदानाचा हक्क बजावू शकतील. मतदानाच्या दिवशी अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशा उद्योगांतील कामगार-मतदारांना हा आदेश लागू होणार नाही. कामगारांना भरपगारी सुट्टी देण्यासंदर्भातील सूचनेचे पालन अथवा त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेशही ठाण्याच्या कामगार उपायुक्तांनी दिले आहेत. त्यात शॉपिंग सेंटर, मॉल, रिटेलर्स आदी ठिकाणी काम करणाऱ्यांनाही भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, संबधित कामगार कार्यालय आणि स्थानिक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय आदी ठिकाणी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी २५८२७४४९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.