शीळ येथील बंद दगडखाणीच्या जागेवर व्यवस्थापन
ठाणे शहरातून दररोज निघणाऱ्या सुमारे ६६० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट कोठे लावायची, हा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघाला असून मुंब्य्रानजिक असलेल्या शीळ परिसरातील वन खात्याच्या अखत्यारीत येणारी अडीच एकर आकाराची बंद पडलेली खदाण ठाण्याच्या कचरा विल्हेवाटीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सद्य:स्थितीत शहरातील कचरा दिवा परिसरातील खासगी जमिनीवर तसेच खाडीकिनारी नेऊन टाकला जात असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने मध्यंतरी गुन्हे दाखल केले होते. या पाश्र्वभूमीवर बंद पडलेल्या खदाणींमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
ठाणे-नवी मुंबईच्या वेशीवर असलेली बंद खदाणीची जागा कचराभूमीसाठी हस्तांतरित केली जावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे पाठविला होता. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांची लोकसंख्या एव्हाना २२ लाखाच्या आसपास पोहचली आहे. या शहरातून दररोज सुमारे ६०० मेट्रिक टन इतक्या प्रचंड प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत आहे. मुंबई शहरातील कचरा मुलुंड परिसरातील कचराभूमीवर टाकण्यास या भागातील रहिवाशांनी विरोध केला आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरालगत अशी जागा कुठे शोधायची, असा प्रश्न गेली अनेक वर्षे ठाणे महापालिकेस सतावत होता. मध्यंतरी डायघर परिसरातील विस्तीर्ण भूखंडावर कचराभूमी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. मात्र, या भागास कचराभूमी उभारण्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध सुरू केला. त्यामुळे ठाण्याचा कचरा पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. कल्याण डोंबिवली शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने उच्च न्यायालयाने या भागातील बांधकामांना मंजुरी देऊ नये, असे स्पष्ट आदेश महापालिकेस दिले आहे. ठाणे महापालिकेवरही ही वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. या पाश्र्वभूमीवर ठाणे-नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या बंद दगडखाणींची जागा हस्तांतरित केली गेल्यास त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचराभूमी उभारली जाईल, असा प्रस्ताव आयुक्त संजीव जयस्वाल यांनी राज्य सरकारपुढे ठेवला होता. काळाची गरज ओळखून या प्रस्तावास मंजुरी दिली जावी, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून जयस्वाल त्याचा पाठपुरावा करत होते.
नवी मुंबईतील तुर्भे परिसरात अशाच स्वरूपाची कचराभूमी उभारण्यास राज्य सरकारने यापूर्वी नवी मुंबई महापालिकेस मान्यता दिली आहे. याच धर्तीवर ठाणे महापालिकेसही परवानगी द्यावी, यासाठी हा पाठपुरावा सुरू होता. पर्यावरण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मालिनी शंकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पर्यावरण परिणाम प्राधिकरणाने अखेर ठाणे महापालिकेच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून कचराभूमीसाठी जागा देण्यास मंजुरी दिली आहे. मौजे शीळ येथे वन खात्याच्या जमिनीवर अंदाजे अडीच एकर जागेत बंद पडलेली खदाण आहे. सदरची खदाण घनकचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी देण्यात आली आहे, असे जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2016 रोजी प्रकाशित
ठाण्याच्या कचऱ्याला आता भूमीलाभ!
अडीच एकर आकाराची बंद पडलेली खदाण ठाण्याच्या कचरा विल्हेवाटीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-04-2016 at 04:03 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc get place for waste disposal