ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आदेश महापौर संजय मोरे यांनी देऊनही बहुतांश अधिकारी दांडीबहाद्दर असल्याचे गुरुवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. महापालिकेतील प्रमुख विभाग अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे जाहीर नाराजी व्यक्त करत अशा दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी पुन्हा एकदा दिले आहेत.
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या सभांना अनेक अधिकारी गैरहजर राहत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे नगरसेवक कमालीचे नाराज असून महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात वरचेवर खटके उडू लागले आहेत. प्रभागातील एखाद्या विकासकामाच्या किंवा कामातील काही त्रुटीसंबंधी माहिती विचारण्याकरिता लोकप्रतिनिधींकडून सभांमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात येतात.
मात्र, या सभांमध्ये संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे लोकप्रतिनिधींना उत्तरे मिळत नाही. अधिकारी उपस्थित नसल्यामुळे प्रशासनाचा निषेध व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण तसेच स्थायी समितीच्या अनेक सभा यापूर्वी तहकूब केल्या आहेत. या मुद्दय़ावरून अनेकदा लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. यामुळे काही महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या सभांना उपस्थित राहण्याचे आदेश महापौरांनी दिले होते.

लोकप्रतिनिधी हतबल
बाजाराच्या बांधकामाविषयी माहिती मागितली. मात्र, याविषयी उत्तर देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. या कामाविषयी नगर अभियंता रतन अवसरमोल अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. तसेच गैरहजर अधिकाऱ्यांमुळे प्रभागातील एखाद्या कामाविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे चित्रही यानिमित्ताने पाहावयास मिळाले. दरम्यान, याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी पुन्हा एकदा दिले. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नगर अभियंता रतन अवसरमोल यांनी दिले.