ठाणे महापालिकेचे स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांच्या आदेशांना वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अक्षरश: केराची टोपली दाखवत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीच्या बैठकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे सभापतींनी अनेकदा सांगितले आहे. मात्र, या आदेशांना फारसे कुणी जुमानत नसल्याने सभापती हतबल झाल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत पाहायला मिळाले. दरम्यान, महापालिका प्रशासनाने संबंधित दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
ठाणे शहरात नवनवे विकास प्रकल्प तसेच नवीन योजना राबविण्याकरिता महापालिका प्रशासनामार्फत प्रस्ताव तयार करण्यात येतात. याशिवाय, शहरातील विकासाच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक निर्णय घेण्यासंबंधीचे प्रस्ताव तयार करण्यात येतात. या सर्व प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळण्यासाठी त्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात येतात, तसेच वित्तीय मंजुरीसाठी हे प्रस्ताव स्थायी समितीपुढे येतात. या प्रस्तावांना मंजुरी देण्याआधी लोकप्रतिनिधी त्यावर सविस्तर चर्चा करतात. त्यामध्ये काही उणिवा किंवा त्रुटी समोर आल्या तर त्या दुरुस्त करण्यासंबंधी सूचना करतात. काही वेळेस महापालिका प्रशासनाकडून प्रस्तावासंबंधी स्पष्टीकरण मागितले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या बैठकींना गैरहजर राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे बैठकीतील चर्चेदरम्यान महापालिका प्रशासनामार्फत कोणतेच उत्तर मिळत नसल्याने सर्वच लोकप्रतिनिधी व्यथित झाले असून याविषयी त्यांनी अनेकदा बैठकीत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेकदा लोकप्रतिनिधींनी सभा तहकूब केल्या आहेत.

* नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील लेडीज बारच्या मुद्दय़ावरून चर्चा सुरू असताना महत्त्वाचे अधिकारी सभागृहात नसल्याचे दिसून आले.
* दोन महिन्यांपूर्वी ही माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असतानाही प्रभाग स्तरावर ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
* या बैठकीला बहुतेक सहायक आयुक्त उपस्थित नसल्याने सदस्यांना चर्चा थांबवावी लागल्याचे दिसून आले.
* सहायक आयुक्त बैठकींना हजर नसतात, त्यांचे मोबाइल बंद असतात, कोणतेही निर्णय घेत नाहीत, असा आरोप या वेळी सदस्यांनी केला.
* वरिष्ठ अधिकारी बैठकांना सातत्याने दांडी मारत असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त करताच महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले.