व्यावसायिकांबाबत शहर विकास विभागाच्या बैठकीत ठाणे महापालिकेचा निर्णय
ठाणे शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेत बाधित झालेल्या व्यावसायिक बांधकामधारकांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. यापूर्वी रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येत होते, मात्र त्याच धर्तीवर दुकानदारांनाही त्याच परिसरात दुकाने मिळणार आहेत. तसेच उपवन येथील औद्योगिक गाळेधारकांसाठी खारीगाव परिसरात जकात नाक्यासाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये फेरबदल करून तिथे औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
आयुक्तांनी सोमवारी शहर विकास विभागाचे अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन त्यात हे निर्णय घेतले. विविध भागांमध्ये रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत बेकायदा बांधकामे हटविण्यात आली. त्यात बाधित झालेल्या रहिवाशांचे तात्काळ पुनर्वसन करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले होते व त्यानुसार त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. मात्र या रुंदीकरणात बाधित झालेल्या गाळेधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत आयुक्त जयस्वाल यांनी रहिवाशांप्रमाणे गाळेधारकांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. उपवन औद्य्ोगिक वसाहतीमध्ये ३६ व्यावसायिक गाळे बाधित होत असून त्यांचे पुनर्वसन खारीगाव येथे जकात नाक्यासाठी आरक्षित जागेवर करण्यात येणार आहे. कळव्यामधील बाधित व्यावसायिक गाळ्यांचे कळवा नाका येथील मार्केटमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. मुंब्रा येथील जुना मुंबई-पुणे रोडवरील जे व्यावसायिक गाळे होते त्यांचे पुनर्वसन अग्निशमन दलाच्या मागे असलेल्या २००० चौरस मीटर जागेत करण्यात येणार आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळात मुंब्य्रामध्ये ११४ दुकाने तोडण्यात आली होती. तसेच गेल्या आठवडय़ामध्ये सहा दुकाने तोडली तसेच उर्वरित तोडण्यात येणारे दहा गाळे अशा सर्वाचे पुनर्वसन कौसा मार्केट येथे करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुनर्वसन कसे असेल..
’ पोखरण रस्ता क्रमांक एकमधील शंभर टक्केबांधीत असलेल्या ५४ व्यावसायिक बांधकामधारकांचे पुनर्वसन दोस्ती विहारमधील १६०० चौरस मीटर सुविधा भूखंड येथे करण्यात येणार आहे.
’ पोखरण रस्ता क्रमांक दोनमध्ये बाधित होणाऱ्या ११७ व्यावसायिक गाळ्यांचे पुनर्वसन त्याच रस्त्यावर असलेल्या १३०० चौरस मीटरच्या सुविधा भूखंडावर करण्यात येणार आहे.
’ ग्लेंडल सोसायटीच्या समोर दोन्ही बाजूला असलेली ५००० चौरस फुटाच्या पालिकेच्या जागेत तसेच ग्लॅडी अल्वारीस रोडवर उपलब्ध असलेल्या १५०० चौरस मीटर जागेतही व्यावसायिक गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
’ म्हाडा वसाहतीत तोडलेल्या टपऱ्यांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी म्हाडाकडून प्राप्त झालेल्या ३००० चौरस मीटर जागेत करण्यात येणार आहे. तसेच इमारत क्रमांक ४० ते ४६ येथे सहा ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात येणार आहे.
’ स्थानक परिसरातील बाधित व्यावसायिक गाळेधारकांपैकी रेल्वे स्टेशन ते जुने महापालिका कार्यालय येथील बाधितांचे पुनर्वसन महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागेवर करण्यात येणार असून जुने महापालिका कार्यालय ते जांभळी नाका येथील बाधितांचे पुनर्वसन गुजराती शाळेच्या आवारात करण्यात येणार आहे.
’ तीन हात नाका या परिसरातील बाधित व्यावसायिक गाळ्यांचे पुनर्वसन तीन हात नाका मिनी मॉलमध्ये होईल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc to rehabilitate traders in same area affected in road widening project
First published on: 18-05-2016 at 05:10 IST