बेस्टने भाडे कमी केले तरी टीएमटी, एनएमटीच्या तुलनेत भाडे जास्तच

उत्पन्नवाढीसाठी बेस्टने वातानुकूलित बसचा प्रवास स्वस्त केला असला तरी प्रत्यक्षात मात्र ठाणे आणि नवी मुंबई परिवहन सेवेच्या तुलनेत बेस्टचा प्रवास महागच आहे. बेस्टच्या वातानुकूलित बसचे तिकीट दर कमी करण्यात आल्यामुळे ठाणे-बोरिवली मार्गावरील ठाणे व नवी मुंबई परिवहन सेवेचे प्रवासी बेस्टकडे वळतील आणि दोन्ही परिवहन सेवेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, दोन्ही परिवहन सेवेच्या तुलनेत तिकिटाचे दर पाच ते दहा रुपयांनी महाग असल्यामुळे प्रवाशांनी बेस्टच्या वातानुकूलित बसकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ठाणे-बोरिवली मार्गावर आजही बेस्टच्या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात ३० वातानुकूलित बस आहेत. या बस अंधेरी, बोरिवली या मार्गावर चालविण्यात येतात. साध्या आणि वातानुकूलित बसमधून दररोज २२ लाखांचे उत्पन्न परिवहनला मिळते. २२ लाखांमध्ये पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न वातानुकूलित बसमधून मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नादुरुस्त बसमुळे परिवहनची आर्थिक घडी विस्कटत असतानाच वातानुकूलित बसच्या उत्पन्नाने परिवहनला तारले आहे. अंधेरी, बीकेसी आणि बोरिवली या तिन्ही मार्गावर वातानुकूलित बस चालविण्यात येतात. अंधेरी मार्गावर ४० हजार, तर बीकेसी मार्गावर ५० हजार रुपयांचे दररोज उत्पन्न मिळते. एकटय़ा बोरिवली मार्गावर दररोज चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. या मार्गावर नवी मुंबई तसेच बेस्टच्या बस धावत असल्या तरी या स्पर्धेत ठाणे परिवहन सेवा आजही टिकून आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे-बोरिवली या मार्गावर ठाणे, नवी मुंबई तसेच बेस्ट अशा तिन्ही परिवहन सेवेच्या वातानुकूलित बस धावतात. या मार्गासाठी ठाणे परिवहन सेवेच्या वातानुकूलित बसचे तिकीट दर ८५ रुपये, तर नवी मुंबई परिवहन सेवेचे तिकीट दर ९० रुपये आहे. बेस्टचे यापूर्वीचे तिकिटाचे दर १२० रुपये होते. ठाणे व नवी मुंबई परिवहनच्या तुलनेत हे तिकीट महाग असल्यामुळे प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी बेस्टने वातानुकूलित बसचा प्रवास स्वस्त केला असून नव्या दरानुसार ठाणे-बोरिवली मार्गासाठी बेस्ट बसच्या तिकिटाचे दर ९५ रुपये आहे. बेस्टने २५ रुपयांनी तिकिटाचे दर कमी केले असले तरी ठाणे आणि नवी मुंबई परिवहन सेवेच्या तुलनेत तिकिटाचे दर पाच ते दहा रुपयांनी महाग आहेत.

ठाणे-बोरिवली हा मार्ग टीएमटीच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर वातानुकूलित बसमधून चांगली सेवा पुरविण्यात येते. त्यामुळे बेस्टने तिकिटाचे दर कमी केले असले तरी त्याचा फारसा परिणाम आमच्या सेवेवर झालेला नाही. या मार्गावर पूर्वीप्रमाणेच प्रवाशांचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे.

– संदीप माळवी, व्यवस्थापक, ठाणे परिवहन

आम्ही बेस्टच्या वातानुकूलित बसचे दर नुकतेच कमी केले असून त्याचा किती प्रतिसाद मिळतो, याचा आढावा घेण्यात येत आहे. या आढाव्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

– जगदीश पाटील,  व्यवस्थापक, बेस्ट