बदलापूर पालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २६ ते ४७ हे बदलापूर पूर्व विभागात मोडत असून यंदा पूर्व भागातील या लढती अनेक कारणांमुळे बदलापुरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या भागात तीन जागा बिनविरोध आल्या असून त्यात भाजपच्या दोन तर, शिवसेनेची एक जागा आहे. तसेच, या भागात तिकीट न मिळाल्याने काही अपक्षांनी प्रमुख पक्षांना आव्हान निर्माण केले आहे, तर शिवसेनेचा पश्चिमेकडील नेता आता पूर्वेत आपले नशीब अजमावत आहे.
प्रभाग क्रमांक २६ मध्ये दोन वेळा राष्ट्रवादीतून नगरसेवक झालेले व सध्या शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांची भाजपच्या सूरज मुठे व अपक्ष जयेश राऊत या तरुण उमेदवारांशी लढत आहे. सूरज मुठे हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत मुठे यांचे नातेवाईक असल्याने या लढतीत रंगत येणार आहे. प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेना व भाजपमध्ये लढत असली तरी येथे कुळगांव बदलापूर विकास समितीचे प्रभाकर पराष्टेकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २८ हा भाजपत झालेल्या बंडखोरीने चर्चेत आलेला प्रभाग असून एबी फॉर्म दोन उमेदवारांना दिल्याने येथे घोळ झाला होता. त्यामुळे आता भाजपच्या उमेदवार तनुजा गोळे व अपक्ष विद्या आपटे यांच्यातच येथे खरी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक २९ ही दोन आजी-माजी नगरसेवकांत लढत असून यात शिवसेनेचे उल्हास आंबवणे, भाजपचे माजी नगरसेवक संजय भोईर व मनसेचे विद्यमान नगरसेवक विकास गुप्ते यांच्यात ही लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ३० मध्ये माजी नगरसेवक संभाजी शिंदे व शिवसेनेचे प्रकाश पालांडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. प्रभाग क्रमांक ३१, ३४ व ३७ या प्रभागांत एकच उमेदवार शिल्लक राहिल्याने येथील लढती बिनविरोध झाल्या आहेत.