डोंबिवली- ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील महाराष्ट्र बँक ते चोळेगाव हनुमान मंदिर रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अरूंद रस्त्यामुळे वाहन कोंडी होत आहे. या अरूंद रस्त्याच्या दुतर्फा अनेक ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करून बाजुच्या दुकानात खरेदीसाठी जातात. या वाहनांमुळे ठाकुर्ली-चोळेगावांमधील रस्ते वाहन कोंडीत अडकले आहेत. या कोंडीचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्गाला बसत आहे. कल्याण, डोंबिवलीतून येणाऱ्या वाहनांचा भार या रस्त्यावर पडत असल्याने अनेक वेळा पाऊण तास वाहने या कोंडीत अडकून पडतात. संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा रस्ता कमी अधिक प्रमाणात अनेक वेळा वाहन कोंडीत अडकतो. या भागातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांमध्ये खरेदीसाठी आलेला ग्राहक वाहन रस्त्यावर उभे करतो. ही वाहने कोंडी निर्माण करतात, असे प्रवासी सांगतात. वाहतूक विभागाने येथे पोलीस तैनात केला की ग्राहक दुकानासमोर वाहन उभे करत नाही, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. ही कोंडी सोडविण्यासाठी माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, अजय चौधरी, विजय चौधरी, सचिन जोशी हे स्थानिक रहिवासी पुढाकार घेतात.

कशामुळे होते कोंडी

कल्याणहून डोंबिवलीत किंवा डोंबिवलीहून कल्याणला १० मिनीटाच्या आत पोहचण्यासाठी ठाकुर्ली-चोळेतील रस्ता मधला मार्ग आहे. वाहन चालक घरडा सर्कलमार्गे न जाता प्रत्येक वाहन चालक ठाकुर्ली-चोळेगावातील अरूंद रस्त्यावरून येजा करतात.

कल्याण पत्रीपुलाकडून डोंबिवलीत येणारा वाहन चालक पत्रीपुलाजवळ उजवे वळण घेऊन ९० फुटी रस्त्याने म्हसोबा चौकातून चोळेतील हनुमान मंदिर ते महाराष्ट्र बँक दरम्यानच्या ३५ फुट लांबीच्या अरूंद रस्त्यावर येतो.

डोंबिवलीतून वाहन चालक कल्याणला ठाकुर्ली पूल समांतर रस्त्याने, पेंडसेनगरमधून मंदिर रस्त्यावरून म्हसोबा चौकातून जातो.

बंदिश हॉटेलकडून चालक ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे हनुमान मंदिर अरूंद रस्त्यावरून येतो.

म्हसोबा चौकातून मंदिरासमोरील रस्त्यावर आलेले वाहन उजवे वळण घेऊन ठाकुर्ली स्थानक, डोंबिवलीत जाण्याचा प्रयत्न करतात. काही चालक डावे वळण घेऊन बंदिश हॉटेलकडे जातात.

कल्याणहून आलेले वाहन चालक महाराष्ट्र बँके समोर उजवे वळण घेऊन ठाकुर्ली पुलाकडे येण्याचा प्रयत्न करतात.

पेंडसेनगरमधून आलेले वाहन चालक ठाकुर्ली स्थानकाकडे जाणाऱ्या वाहन चालकाला जाण्यास रस्ता ठेवत नाहीत.

पर्यायी व्यवस्था

महिला समिती-साई बाबा मंदिर दरम्यान रेल्वे जागेतून १०० मीटर जागा पालिकेला मिळाली तर पर्यायी रस्ता तयार होईल. ९० फुटी रस्ता ते मुख्य रस्ता दरम्यान तीन विकास आराखड्यातील रस्ते आहेत. ते विकसित करण्यासाठी अनेक वर्ष पालिकेकडे पाठपुरावा करतो, असे माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी सांगितले. ठाकुर्ली पुलाचे म्हसोबा चौकातील काम वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे.

अरूंद रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांमध्ये खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात. ही येथील अडचण आहे. — उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली