अपघातग्रस्त, नादुरस्त वाहने रस्त्यातच पडून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण शिळफाटा रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात अपघात झालेली, जळलेली पडीक वाहने वर्षांनुवर्षे पडून आहेत. संबंधित वाहने मालक उचलून नेत नाहीत. या वाहनांमधील सर्व यंत्रसामुग्री भंगार चोरांनी चोरून नेलेली आहे. अशा प्रकारची बेवारस वाहने शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर घालीत आहेत. ती वाहने तातडीने उचलण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपूल ते शिळफाटा चौक (दत्त मंदिर) दरम्यानच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात वाहन दुरुस्तीची गॅरेज आहेत. या बेकायदा गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली वाहने उभी करण्यासाठी जागा नाही, म्हणून ही वाहने शिळफाटा रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येतात. शिळफाटा रस्त्याच्या एका बाजूकडील सेवा रस्त्यावर (सव्‍‌र्हिस रोड) ही वाहने आडवीतिडवी उभी असतात. त्यामुळे सेवा रस्त्याने जाणाऱ्यांना पुढे रस्ता नसल्याने शिळफाटा रस्त्याचा आधार घेतात.

काही वाहने अपघात झाल्याने एकाच जागी उभी आहेत. त्यामधील सर्व यंत्रसामुग्री भंगार चोरांनी चोरून नेलेली आहे. शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडीला सुरुवात झाली की जागोजागी उभी असलेली ही वाहने वाहतुकीला मोठा अडसर ठरतो.  काही अपघातग्रस्त वाहनांचे न्यायालयात दावे सुरू आहेत. त्यामुळे दाव्याचा निकाल लागेपर्यंत काही उचलता येत नाहीत, असे काही वाहन चालकांचे म्हणणे आहे. जनरेटरची सुविधा पुरविणारी कार्यालये शिळफाटा रस्त्याच्या जवळ आहेत. जनरेटर मालकाची सगळी वाहने मुख्य रस्त्यावर उभी असतात. शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही भंगार वाहनांची अडगळ वाहतूक कोंडीत मोठी भर घालतात. ही वाहने उचलण्यासाठी संबंधित विभागांना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार सुभाष भोईर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

बेकायदा व्यावसायिकांचे आक्रमण

अलीकडे कोणाला काही उपजीविकेचा धंदा करायचा असला की त्याला स्वस्तात मस्त शिळफाटा रस्ता हे उपजीविकेसाठी मोठे साधन वाटते. मग तो रस्त्यालगत बिनधास्तपणे टपरी, गादी कारखाना, हॉटेल टाकून व्यवसाय सुरू करतो. दोन-चार जण एकत्र येऊन गॅरेज सुरू करतात, या नियमबाह्य़ व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांवर राज्य रस्ते विकास महामंडळ, एमआयडीसी, महापालिका, पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत याचे आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया या भागातील रहिवासी श्रीराम जोशी यांनी दिली. या नियमबाह्य़ व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून स्थानिक यंत्रणा मोठय़ा प्रमाणात हप्ते जमा करतात, असे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion on silaphata road due to disinherit vehicles
First published on: 27-09-2016 at 00:59 IST