मुलुंड चेक नाका, विटावा, शिळफाटा-पलावा भागात वाहतूक कोंडी

ऋषिकेश मुळे, किशोर कोकणे

ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीनही शहरांच्या वेशींवर मेट्रो प्रकल्पांची कामे जोर धरू लागल्याने वाहतुकीचे नियोजन करताना स्थानिक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरील टोलकोंडीपाठोपाठ मॉडेला चेक नाका, मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोल नाका, कल्याण-शिळ आणि मुंब्रा बाह्यवळण मार्ग अशी ठाण्याची सगळी प्रवेशद्वारे मोठय़ा कोंडीत सापडल्याचे चित्र आहे.

ठाणे शहराच्या प्रवेशद्वारांच्या ठिकाणी आणि पथकर नाक्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठी वाहनकोंडी होत आहे. याशिवाय या प्रवेशद्वारांजवळ उभे करण्यात आलेले बेकायदा रिक्षा थांबे तसेच पथकर नाक्यांवर वाढणारा वाहनांचा लोंढा यामुळे या कोंडीत भर पडू लागली आहे. मॉडेला चेक नाका येथे होणाऱ्या कोंडीचा परिणाम म्हणून सकाळ-सायंकाळ गर्दीच्या वेळेत येथे वाहने टोल आकारणीशिवाय सोडून देण्याची वेळ पथकर व्यवस्थापनावर येत आहे. मेट्रोच्या कामामुळे ठाणे, मुलुंड, भांडुप ही शहरे कोंडीमुळे बेजार झाली आहेत. त्यामुळे ऐरोलीहून थेट मुलुंडमार्गे ठाण्यात येऊ इच्छिणाऱ्यांची मोठी गर्दी होत असून या वाहनांचा भारही पूर्व द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यावर वाढला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

शिळफाटय़ावर खासगी वाहनांची गर्दी

शिळफाटा आणि पलावा या भागात मोठय़ा प्रमाणावर लोकवसाहती वसू लागल्या आहेत. या परिसरात आजूबाजूला रेल्वे स्थानक नसल्याने प्रवासासाठी शिळफाटा-पलावा परिसरातील नागरिकांनी खासगी वाहने मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या परिसरातून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असून रस्ता मात्र अरुंदच असल्याने या भागात वाहतूक कोंडी होत आहे.

बेकायदा रिक्षाथांबे, पार्किंगचा फटका

गेल्या काही दिवसांपासून मुलुंड भागातून ठाण्यात प्रवेश करणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा फटका हा मुलुंड चेक नाका परिसरातील पथकर नाक्याला बसून वाहनांच्या दूरवर रांगा लागून वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. शहराच्या या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असणारे रिक्षा थांबे आणि अनधिकृतपणे उभी करण्यात आलेली मालवाहू वाहने यामुळे वाहनांना पथकर नाक्यावर प्रवास करण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी पथकर नाक्यावर कोंडी होते असे स्थानिक वाहनचालकांकडून सांगण्यात आले आहे. सायंकाळी कार्यालयातून ठाण्याच्या दिशेने घरी परतणाऱ्या वाहनचालकांना मुलुंड येथील पथकर नाक्यावर अर्ध्या तासाहून अधिक काळ अडकून राहावे लागते. अखेर पथकर नाक्यावर होणारी कोंडी दूर करण्यासाठी पथकर नाकाचालक हे वाहनांकडून पथकर न स्वीकारता वाहनांना मोफत प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्याचे पथकर व्यवस्थापनातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अरुंद रस्त्यामुळे खोळंबा

नवी मुंबई येथून विटावामार्गे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्याही अधिक आहे. नवी मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. या नागरिकांचा सायंकाळी परतीचा प्रवास खासगी वाहनाने ठाणे शहराच्या दिशेने अधिक होतो. मात्र नवी मुंबईहून आठ पदरी मार्ग हा विटावा येथे आल्यानंतर दोन पदरी होतो. त्यामुळे विटावा येथील प्रवेशद्वाराजवळ वाहनांची कोंडी होते. पूर्व द्रुतगती मार्गावरही आनंदनगर पथकर नाक्यावर कोंडी होत असून सायंकाळच्या वेळेस वाहनांच्या गर्दीत भर पडत आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक ही बारा बंगलामार्गे वळवण्यात आल्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील कोंडी दूर झाली आहे. इतर ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्न करीत आहे.

– अमित काळे, पोलीस  उपायुक्त-ठाणे वाहतूक शाखा