रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत पुलावर सीमेंटच्या तुळया ठेवण्याचे काम ; हलक्या वाहनांची एका मार्गिकेतून ये-जा

कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील देसई खाडीवर नवीन पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी सीमेंटच्या तुळया ठेवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केले जाणार आहे. या कामासाठी कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील देसई खाडी पुलावरून जाणारी वाहतूक शुक्रवारी रात्री ११ वाजल्यापासून पासून ते रविवारी रात्री १२ या कालावधीत रात्रीच्या वेळेत ११ ते पहाटे ६ वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पलावा चौका जवळील देसई खाडी पुलावर नवीन पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी सीमेंटच्या तुळया ठेवण्याचे काम अवजड क्रेनच्या साहाय्याने केले जाणार आहे. हे क्रेन मुख्य रस्त्यावर ठेऊन त्या साहाय्याने तुळया पुलाच्या सांगाड्यावर ठेवल्या जाणार आहेत. हे काम करताना शीळफाटा-कल्याणकडून येजा करणाऱ्या वाहनांची कोंडी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेत हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

ट्रक, ट्रेलर, हायवा, मालवाहू ट्रक अशी सर्व अवजड वाहतूक या दोन दिवसात रात्रीच्या वेळेत बंद राहिल. पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने यांची येजा या रस्त्यावरील एका मार्गिकेतून काम सुरू असताना सुरू राहिल अशी व्यवस्था करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय कामाचे स्वरूप आणि गती पाहून या रस्त्यावरून कल्याण फाटाकडून येणारी आणि डोंबिवलीकडून कल्याण फाट्याकडे जाणारीे मोटार, दुचाकी हलकी वाहने एका मार्गिकेतून सोडण्यात येत आहेत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

रात्रीच्या वेळेत वाहनांची संख्या कमी असल्याने पूल बंदचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होत नाही. कोणत्याही प्रकारची कोंडी या रस्त्यावर होणार नाही यासाठी मानपाडा चौक, काटई चौक, खोणी नाका, कल्याण फाटा, देसई खाडी पूल, पलावा चौक भागात रात्री काम सुरू झाल्यानंतर वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात केले जात आहेत. हलकी वाहने देसई पुलाच्या एका मार्गिकेतून सोडली जात असल्याने प्रवाशांचा वळसा कमी झाला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पूल बंद राहिल्याने वाहनांचा प्रवास

कल्याण फाटा येथून कल्याण, बदलापूर दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने कल्याण फाटा येथून मुंब्रा बाह्यवळण रस्ता, खारेगाव टोलनाका मार्गे भिवंडी, नाशिक दिशेने इच्छित स्थळी जातील.
कल्याण, डोंबिवलीकडून कल्याण फाटा दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना बदलापूर फाटा (काटई चौक) येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही सर्व जड, अवजड वाहने बदलापूर चौक, खोणी नाका, तळोजा एमआयडीसीतून इच्छित स्थळी जातील.