ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर सोमवारी दुपारी तेलाचा टँकर उलटल्याने शिळफाटा येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर तब्बल सात तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे हाल झाले. केवळ १० मिनिटांचे अंतर पार करण्यास वाहनचालकांना सुमारे पाऊण तास लागला. वाहतूक कोंडीमुळे दुपारी भर उन्हात दुचाकीस्वारांचे हाल झाले. अखेर रात्री ८ वाजेनंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. 

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारा एक टँकर दुपारी १ वाजेच्या सुमारास मुंब्रा देवी मंदिर परिसरात एका दुभाजकाला धडकला. या घटनेमुळे टँकर भर रस्त्यात उलटला होता, तसेच टँकरमधील तेलही मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर सांडले होते. तेल सांडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पोलिसांनी रोखून धरली. त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर झाला. त्यामुळे मुंब्रा देवी मंदिर ते कौसापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच या मार्गावर एक वाहन बंद पडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. या मार्गिकेवरून वाहतूक करणाऱ्या काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने म्हणजेच ठाण्याहून शिळफाटय़ाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. परंतु या मार्गिकेवरही दोन वाहने बंद पडली. त्याचा परिणाम होऊन मुंब्रा देवी मंदिर ते खारेगाव टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी दुपारी तीन वाजेपर्यंत बंद पडलेली वाहने आणि अपघातग्रस्त टँकर बाजूला केला, परंतु दुपारी अवजड वाहनांची वाहतूक आणि मार्गावरील भार यामुळे वाहतूक कोंडी सुटली नव्हती. दुपारी चारनंतर पोलिसांनी ठाण्याहून शिळफाटय़ाच्या दिशेकडील वाहतूक कोंडी सोडविली, परंतु शिळफाटा येथून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक कोंडी कायम होती. दुपारी भर उन्हात वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागल्याने वाहनचालकांचे हाल झाले होते. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना पाऊण तास लागत होता. रात्री आठनंतर या मार्गिकेवरील वाहतूक कोंडी सुरळीत झाली.