ठाण्यातील मुजोर रिक्षाचालकांना ‘शिक्षा’

प्रवाशांना तात्काळ रिक्षा, बसगाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी ठाणे महापालिकेने सॅटिस पुलावर टीएमटी बसगाड्यांचा थांबा तर सॅटिस पुलाखाली रिक्षाथांबा सुरू केला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

|| किशोर कोकणे

वाहतूक पोलीस, परिवहन, रेल्वे सुरक्षा दल यांचा संयुक्त आराखडा

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील काही रिक्षाचालकांची मुजोरी वाढली असून त्यांच्याकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केले जाते. अशा बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी परिवहन विभाग, लोहमार्ग पोलीस, ठाणेनगर पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलासोबत एक संयुक्त आराखडा तयार केला आहे. येत्या पाच ते सहा दिवसात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

प्रवाशांना तात्काळ रिक्षा, बसगाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी ठाणे महापालिकेने सॅटिस पुलावर टीएमटी बसगाड्यांचा थांबा तर सॅटिस पुलाखाली रिक्षाथांबा सुरू केला आहे. येथे प्रवासी रांगेत उभे राहून थांब्यावरील रिक्षामध्ये बसून प्रवास करतात. गेल्या काही महिन्यांपासून रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूटमार करण्यास सुरुवात केली आहे. काही रिक्षाचालक सॅटिस पुलाखालील थांबा सोडून स्थानक परिसरात कुठेही रिक्षा उभ्या करतात. त्यानंतर हे रिक्षा चालक स्थानक परिसरात चालत जाऊन घोडबंदर, मीरा-भाईंदर, हिरानंदानी येथील प्रवाशांना हेरून त्यांना रिक्षात बसवतात. तसेच या भागात जाण्यासाठी त्यांच्याकडून जादा रिक्षाभाडे आकारत आहेत. अनेकदा महिलांशीही हे रिक्षाचालक गैरवर्तन करतात.

पोलिसांनी अखेर प्रवाशांच्या समस्येची दखल घेत गुरुवारी दुपारी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती.या बैठकीस वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह लोहमार्ग पोलीस, ठाणेनगर पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  प्रशासनाने या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आराखडा तयार केला. येत्या चार ते पाच दिवसांत आणखी नियोजन करून स्थानक परिसरातील ही समस्या सोडविण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे.  या नियोजनामुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आराखडा काय?

ठाणेनगर पोलिसांकडून  सॅटिस पुलावर चार ते पाच अधिकारी-कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.

ठाणे स्थानकाच्या आवारात येणाऱ्या रिक्षाचालकांना रोखण्यासाठी लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा दलाचे २० कर्मचारी नेमले जाणार आहे.

थांबे सोडून वेड्यावाकड्या पद्धतीने उभ्या असलेल्या रिक्षाचालकांना आवर घालण्यासाठी तसेच रिक्षा थांब्याच्या पुढे जाणार नाही यासाठी वाहतूक पोलिसांचे एक साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहा कर्मचारी असणार आहेत.

बोगस रिक्षाचालकांविरोधात परिवहन विभागाचेही दोन कर्मचारी या ठिकाणी तैनात केले जाणार आहे.

स्थानक परिसरात रिक्षाचालकांकडून होणाऱ्या नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी सर्वच विभागाची बैठक झाली. येत्या काही दिवसांत रिक्षा संघटनांचीही बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर पाच ते सहा दिवसांत स्थानक परिसरात पोलिसांची पथके तैनात केली जाणार आहे. काही विशेष कारवायाही आम्ही करणार आहोत.  – बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Traffic police punishment rickshaw pullers in thane akp

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार
ताज्या बातम्या