लाचखोर महिला अधिकाऱ्याला पुन्हा अनधिकृत बांधकाम विभागाचा पदभार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विविध विभागांत अनेक कर्मचारी १५ ते २० वर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी बदल्याही झाल्या होत्या. परंतु वरिष्ठ अधिकारी, राजकीय मंडळींचा दबाव आणत या बदल्या रद्द करण्यात हे कर्मचारी यशस्वी झाले होते. अशा प्रकारे बदल्या रद्द करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व पदभार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढून घेतले आहेत.

प्रशासनाने वर्षांनुवर्षे नगररचना, कर विभाग, अनधिकृत बांधकाम विभागांत ठाण मांडून बसलेल्या वरिष्ठ लिपिक, अधीक्षक, कर निरीक्षक अशा एकूण १९ कर्मचाऱ्यांच्या इतर प्रभागांमध्ये बदल्या केल्या आहेत. दहा प्रभागांमध्ये वरिष्ठ लिपिक संवर्गातील काही कर्मचारी १५ वर्षांहून अधिक काळ मालमत्ता कर, अनधिकृत बांधकाम, फेरीवाला हटाव विभागांचे पदभार सांभाळत आहेत. या कर्मचाऱ्यांचे पदभार आयुक्तांनी काढून घेऊन त्यांच्या जागी नवीन कर्मचारी नियुक्त केले आहेत.

घनकचरा, आरोग्य विभागांतील १०५ कर्मचारी वाहन चालक, सफाई कामगार म्हणून नोकरीला लागले. या कर्मचाऱ्यांनी पदवी, बढतीसाठी आवश्यक शासनाच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. काही कामगार कायद्याचे पदवीधर आहेत. असे असताना त्यापैकी काहींना वाहनचालक, मुकादम, सफाई कामगार म्हणून काम करावे लागत आहे. काही कर्मचारी लिपिकपदाचा पदभार सांभाळत आहेत. त्यांच्या बढतीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा विषय मार्गी लावण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

गरुड यांच्यावर मेहेरनजर?

महिला व बालकल्याण विभागातील कर निरीक्षक स्वाती गरुड यांना दोन वर्षांपूर्वी अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. या कारवाईमुळे काही दिवस त्यांचा मुक्काम पोलीस कोठडी, आधारवाडी तुरुंगात होता. जामीन मिळाल्यानंतर त्या पुन्हा पालिकेत रुजू होण्यात यशस्वी झाल्या. लाचखोर अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेताना अकार्यकारी पदावर (जनसंपर्कापासून दूर) नेमणूक देण्यात यावी असा शासकीय नियम आहे. तरीही गेल्या वर्षी माजी आयुक्त गोविंद बोडके यांनी स्वत:ची बदली झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्या बदलीत स्वाती गरुड यांचाही समावेश होता. गरुड यांची नियुक्ती बेकायदा बांधकामांचे आगर असलेल्या टिटवाळा अ प्रभागात कर विभागात मोक्याच्या जागी करण्यात आली होती. या बदल्या नियमबाह्य़ असल्याचे ‘लोकसत्ता’ने उघड करताच नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्या बदल्या रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. गरुड यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी सुरू आहे. त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. असे असतानाही गरुड यांना पुन्हा एकदा टिटवाळा येथील अ प्रभागात अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात नियुक्ती करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अधिक माहितीसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त उमाकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. परंतु ते बैठकीत व्यग्र असल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.