कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रशासनाने गुरुवारी बदल्या केल्या. काही अधिकारी हे वेगवेगळ्या प्रकरणांत दोषी आढळले असून काहींच्या विभागनिहाय चौकशा सुरू आहेत. त्यामुळे वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना महत्त्व दिले जात आहे.
नगररचना विभागातील उपअभियंता रघुवीर शेळके यांची दक्षता व गुणनियंत्रण विभागात बदली करण्यात आली आहे. ते काही बांधकाम परवानग्या प्रकरणांत अडचणीत आले आहेत. ज्ञानेश्वर अडके, शशिम केदार यांची बांधकाम, मच्छिंद्र हणचाटे, मनोज सांगळे, सचिन घुटे यांची पाणी विभागात बदली करण्यात आली आहे.
अनुप धुवाड, महेश डावरे, लीलाधर नारखेडे, सोमा राठोड, संजय आचवले या अभियंत्यांच्या नगररचना विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.
नगररचनाकार सुभाष पाटील यांच्याकडे कल्याण, तर सुरेंद्र टेंगळे यांच्याकडे डोंबिवली विभागाचा पदभार सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.