ठाणे: ठाणे पोलीस दलातील आणखी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंब्रा पोलीस ठाणे, घोडबंदर भागातील कापूरबावडी, डोंबिवली येथील मानपाडा, मध्यवर्ती, कोळसेवाडी, बाजारपेठ या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली. तर गुरुवारी करण्यात आलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या अखेर घाऊक स्वरूपात झाल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी ३० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांचे आदेश सह आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी काढल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी आणखी काही वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या आणि स्थगितीचे आदेश मेकला यांनी काढले.

मुंब्रा शहर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ आहे. तसेच हे शहर संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. मुंब्रा आणि दिवा ही दोन्ही शहरे मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दोन्ही शहरांची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या पोलीस ठाण्यात मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांची वर्णी लागली आहे. तर, घोडबंदर येथील कापूरबावडी पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांची बदली करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण शाखा भिवंडी युनिटचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना बाजारपेठ आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.  मुंब्रा पोलीस ठाण्याचे मधुकर कड यांची मध्यवर्ती पोलीस ठाण्यात, तर जळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षक बशीर शेख यांची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली झाली आहे. गुन्हे अन्वेषण शाखा, उल्हासनगर युनिटचे पोलीस निरीक्षक महेश तरडे यांची गुरुवारी मुख्यालयात बदली करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांची नेमणूक शहर वाहतूक शाखेत करण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गिते यांची मुंब्रा पोलीस ठाण्यातून पुन्हा शहर वाहतूक शाखेत बदली झाली आहे.  कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांची मध्यवर्ती आणि नियंत्रण कक्षातील सिद्धार्थ गाडे यांची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली होती.