दुर्गम भागातील आदिवासींना आपला जीवनस्तर उंचावण्यासाठी वनहक्क व पेसा कायद्यांची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी ठाण्यात संबंधित यंत्रणांना दिले. तसेच ज्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो, त्या वस्त्यांना टँकरमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी राज्यपालांचे सचिव व्ही.सी.रस्तोगी, उपसचिव परिमल सिंग, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी आदि उपस्थित होते. मुरबाड आणि शहापूर भागातील गावांमध्ये सामुहीक वनहक्क कायद्याचा आदिवासींना लाभ मिळावा म्हणून आवश्यक त्या प्रक्रिया पुर्ण कराव्यात, असेही विद्यासागर राव यांनी बैठकीत सांगितले. काही ग्रामपंचायतींना मत्स्यबीज निर्मितीसाठी तळी (टँक) देण्यात आली असून त्याचा वापर होतो का, याची पाहणी करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच ज्या टँक वापरणयात येत आहेत, तिथे आणखीन काही उपाययोजना करता येतील का, याची चाचपाणी करण्यास त्यांनी सांगितले.