वांगणी म्हणजे हिरवा निसर्ग, डोंगरदऱ्या, हिरवाईने नटलेली शेती.. त्यामुळे या परिसरात फिरायला कुणालाही आवडेल. हिरव्यागार डोंगरातून वाहणारे झऱ्यांचा आनंद घेत जंगलातील पायवाट तुडवत न जाणे कुठल्या पर्यटकाला आवडेल, तो आनंदानुभव वांगणीमध्ये घ्यायला मिळतो. वांगणी तसे आकाशदर्शनासाठी प्रसिद्ध आहे, पण पावसाळ्यात येथील डोंगरांतून असंख्य धबधबे फुटतात आणि मग पर्यटकांची पावले वांगणीकडे वळतात.. असाच वांगणीजवळील एक प्रसिद्ध धबधबा म्हणजे भगीरथ धबधबा. या धबधब्यावरील जलतुषार अंगावर झेलत येथे ‘निर्झर’ आनंद घ्यायला पर्यटकांना नेहमीच आवडते.
वांगणी स्थानकापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर बेडीसगाव आहे. या गावापासून काही अंतरावरच भगीरथ धबधबा आहे. मस्त भातखाचर पाहत, पाऊस अंगावर झेलत या धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा आनंद काही औरच आहे. या धबधब्याकडे जाणारा मार्ग डोंगरावरून जातो. त्यामुळे पर्यटकांना ट्रेकिंग व धबधब्याखाली भिजणे असा दुहेरी आनंद मिळतो. दोन डोंगर तुडवत tv11धबधब्यापर्यंत यावे लागते. पहिल्यांदा डोंगराची वाट चढल्यानंतर दुसऱ्या बाजूने डोंगर उतरावा लागतो, त्यानंतर जंगलातील या निसर्गसौंदर्याने लपेटलेल्या धबधब्यापर्यंत आपण पोहोचतो. धबधब्याखाली पाण्यात चिंब होण्यात आणि हे निसर्गसौंदर्य डोळय़ात साठवण्यात एक वेगळाच परामानंद असतो.
हा धबधबा तसा पर्यटकांसाठी सुरक्षित आहे. जिथे धबधबा पडतो या ठिकाणी जास्त खोली नसल्याने पर्यटक धबधब्याचा मनमुराद आनंद लुटू शकतात. येथील निसर्ग, डोंगरवाटा पर्यटकांना आनंद देतात. चोहोबाजूंनी डोंगर असल्याने येथे अनेक लहान-मोठे धबधबे पाहायला मिळतात. जंगलभ्रमंती करण्याची इच्छा असेल, तर तोही आनंद येथे मिळतो. शहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून त्रासलेल्यांना निसर्गसौंदर्य नेहमीच खुणावत असते. ठाणे, कल्याणपासून काही किलोमीटर अंतरावरच निसर्गाच्या सान्निध्यात असलेला भगीरथ धबधबा त्यामुळेच पर्यटकांचा आकर्षणबिंदू झालेला आहे. ढगाळ आकाश, हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्या, पाण्याचा खळखळाट, धबधब्यातून उडणारे जलतुषार.. निसर्गपर्यटनाचा मनमुराद आनंद येथे मिळतो.

कसे जाल?
भगीरथ धबधबा, वांगणी
* मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकावर उतरावे. वांगणीपासून काही किलोमीटर अंतरावर बेडीसगाव आहे. तिथे रिक्षाने जाता येते. बेडीसगावापासून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे.
वांगणीपासून चालत धबधब्यापर्यंत जाण्यात एक वेगळीच मजा आहे.

ही काळजी घ्या..
* निसर्गसौंदर्याने बहरलेल्या या रमनीय पर्यटनस्थळाचे सौंदर्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे येथे धिंगाणा करणे आणि निसर्गास बाधा पोहोचेल, असे कोणतेही कृत्य करू नका.
* पायवाटेने जाताना काळजी घ्या. निसरडय़ा ठिकाणी पाय घसरण्याची शक्यता आहे.
* डोंगर चढताना वा उतरताना जपून. पाय घसरून अपघात होण्याची शक्यता. डोंगर उताराची वाट थोडी अवघड आहे. त्यामुळे तिथे जरा जपून चालावे लागते.
* धबधब्याच्या ठिकाणी मद्यप्राशन करणे गैर आहे.