घरमालकाच्या मुलाचं अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वसईत ही घटना घडली आहे. शैलेश कुमार असं हत्या झालेल्या पाच वर्षाच्या चिमुरड्याचं नाव आहे. आरोपींची नावे जंगिलाल हरिजन (२२) आणि मोहम्मद इम्रान (२४) अशी आहेत. घरमालकाला धडा शिकवायचा असल्यानेच आपण त्याच्या पाच वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घरमालक ताजेश्वर यांनी घरभाडं थकवल्याने आरोपींचा अपमान केला होता. तसंच त्यांना घरातून बाहेर काढलं होतं. ३ डिसेंबर रोजी शैलेश बेपत्ता झाल्यानंतर वाळीव पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तीन दिवसांनी पोलिसानी रिचर्ड कंपाऊंड येथे एका बंद खोलीतून दुर्गंध येत असल्याचा फोन आला. त्यांनी दरवाजा तोडून पाहिलं असता मुलाचा मृतदेह आढळला.

ताजेश्वर यांनी खंडणीसाठी फोन आला नव्हता यामुळे पोलिसांना वैयक्तिक भांडणातून हत्या झाली असावी अशी शंका आली. त्यांनी ताजेश्वर यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींचा उल्लेख आला. यानंतर पोलिसांनी हरिजन याला नालासोपारा आणि इम्रान याला माहिम येथून अटक केली.