महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेले सुमारे दोन टन वजनाचे निर्माल्य समर्थ भारत व्यासपीठ आणि महानगरपालिकेच्या प्रदुषण नियंत्रण कक्षाच्या वतीने संकलित करण्यात आले. हे संकलित निर्माल्य कोपरी येथील खत प्रकल्पामध्ये नेण्यात येणार असून त्यावर प्रक्रिया करून त्याचे खतामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. समर्थ भारत व्यासपीठाचे स्वयंसेवक आणि महापालिका कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. बेलाची पाने, फळ, झेंडुची आणि अन्य फुले, फळांच्या सालींचा खच, नारळांच्या करवंटय़ा अशा स्वरूपाचे निर्माल्याचे संकलन यावेळी करण्यात आले.
 ‘हर बार इको त्योहार’ ही घोषवाक्य असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रदुषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने शहरातील उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या प्रदुषणावर नियंत्रण राखण्याचे प्रयत्न केले जाते. या उपक्रमांतर्गत गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी बरोबरीनेच प्रत्येक मंदिराच्या सणानिमित्ताने सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. शहरातील प्रदुषणावर नियंत्रण राखणे, कचरा समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने हे उपक्रम राबवले जात असतात.  

महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाणे शहरातील श्री कौपिनेश्वर मंदिरामध्ये सर्वाधिक भाविकांची गर्दी होत असून या भागात मोठय़ा प्रमाणात बेलाची फळे, पाने, झेंडुची फुले, फळांच्या साली असे निर्माल्य तयार होते. मंदिरातून हे निर्माल्य बाहेर काढून ते संस्थेच्या वाहनातून कोपरी येथील खत प्रकल्पामध्ये पाठवण्यात येत होते. सायंकाळपर्यंत सुमारे २ टन निर्माल्य संस्थेच्या वतीने संकलीत करण्यात आले होते, अशी माहिती समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने देण्यात आली.