वसईतील दोन आदिवासी पाडय़ांत अद्याप वीज नाही
सध्या डिजिटल तंत्रज्ञानाचे वारे वाहत असले तरी काही आदिवासी पाडे विकासापासून कोसो दूर आहेत. वसई-विरार शहराजवळ असणाऱ्या मालजीपाडा आणि देवकुंडी या आदिवासी पाडय़ात अद्याप वीज पोहोचलेली नाही. या पाडय़ांमध्ये वीज यावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी काहीच केलेले नसल्याचे दिसून येत आहे. महावितरणनेही या आदिवासी पाडय़ांमध्ये वीज नसल्याचे मान्य केले असून लवकर तिथे वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे.
वसई पूर्वेला महामार्गाजवळ मालजीपाडा आदिवासी पाडा आहे, तर दुसरा आदिवासी पाडा पोमणजवळील देवकुंडी येथे आहे. येथील आजूबाजूंच्या गावांमध्ये वीज आहे, मात्र या पाडय़ांमध्ये वीज पोहोचलेली नाही. हे पाडे वसई-विरार महापालिका हद्दीच्या वेशीवर आहेत. मालजीपाडा येथील पाडय़ात ५० आदिवासी कुटुंबे राहतात, तर देवकुंडी येथे ६० हून अधिक कुटुंबे राहतात. वीज नसल्याने त्यांचा इतर आधुनिक जगाशी संपर्कच जवळपास तुटलेला आहे. परिसराती गावे रोषणाईने उजळून निघत असताना हे पाडे चिमण्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात असतात.
देवकुंडे हे गाव तर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या स्थळाजवळील पाडय़ात मात्र वीज पोहोचलेली नाही. रोजगार हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष सुशांत पाटील यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला, परंतु महावितणाकडून केवळ चालढकल सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी दिलेल्या आदेशाकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
९ महिन्यांत वीज?
या भागातील महावितरणाचे कनिष्ठ अभियंता राहुल नालवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नुकतीच या पाडय़ांची पाहणी केल्याचे सांगितले. या दोन्ही पाडय़ांत अद्याप वीज नाही ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. आम्ही त्यांना केंद्राच्या सौभाग्य योजनेतून वीजजोडणी देणार आहोत. मालजीपाडा येथील आदिवासी पाडय़ात पाच उच्च दाबाच्या वाहिनी टाकून ४ विद्युत खांबाद्वारे वीज देण्यात येईल, तर देवकुंडी येथील ६३ केव्हीएचे रोहीत्र टाकून २४ उच्च दाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जाईल, असे नालवार यांनी सांगितले. या प्रक्रियेला ९ महिने लागणार असल्याचे ते म्हणाले.