येथून जवळच असलेल्या आंबेशिव गावाजवळ उल्हास नदीत बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन जण बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. बदलापूर येथील आठ मित्रांचा एक ग्रुप आंबेशीव येथे पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सागर परब (वय २२, राहणार शिवाजी चौक, बदलापूर) आणि राघव गोसावी (वय २२ राहणार गावदेवी, बदलापूर) यांचा मृत्यू झाला. त्यातील सागर परब याचा मृतदेह सापडला असून राघव गोसावी याचा मृतदेह मात्र मिळाला नाही. संध्याकाळी साडेसातपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशामन दल, स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात येत होते. मात्र अंधार पडल्यावर ही शोधमोहीम थांबवण्यात आल्याची माहिती कुळगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक धनंजय पोरे यांनी दिली.
पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यावर सागर आणि राघव हे दोघेही बुडू लागले. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला. पाण्याची खोली जास्त असल्याने ते पाण्यातून वर आलेच नाही. याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलीस स्टेशनला दिल्यावर पोलीस आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह शोधण्याची मोहिम घेण्यात आली. यात सागरचा मृतदेह कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशामन दलाला आढळून आला. मात्र राघवचा मृतदेह सापडला नाही. या प्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.