सावरकर साहित्य संमेलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी करत सर्वच पक्षातील सावरकरप्रेमींनी एकत्र येऊन या पुरस्काराच्या मागणीसाठी आग्रह धरावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात केली. तसेच सावरकर यांच्यासारखे रत्न आमच्या देशात जन्माला आले, हे संपूर्ण जगाला कळावे म्हणून त्यांना हा पुरस्कार देणे गरजेचे असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित २९ वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. आताचे तुरुंग घरापेक्षा बरे वाटते आणि तेथे विशेष वागणूक मिळते. पण, सावरकरांच्या काळात तसे काही नव्हते. त्यामुळे सावरकरांनी देशासाठी भोगलेल्या मरणयातना लोकांना जोपर्यंत कळणार नाहीत, तोपर्यंत लोकांना स्वातंत्र्याची किंमत कळणार नाही. मात्र, ज्यावेळेस स्वातंत्र्याची किंमत कळेल, त्यावेळेस भारतचे स्वातंत्र्य कधीच जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सावरकर आणि बाळासाहेब या दोघांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे दोघेही हिंदूंसाठी उभे राहिले.

लोक हिंदू बोलायला घाबरत होते, त्यावेळेस बाळासाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यामुळे हा माझा देश असतानाही पंधरा मिनीटात हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा ओवीसी बंधू कसे करू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नाटय़ाभिवाचनातून सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध

जहाल विचारांचे क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, संवेदनशील मनाचे कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता आणि क्रियाशील समाजसुधारक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र नाटय़ अभिवाचनाच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न ठाणे आर्ट गिल्डच्या कलावंतांनी केला.  गडकरी रंगायतनमध्ये आयोजित २९ वे अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या निमित्ताने माधव खाडिलकर लिखित ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला.

अभ्यासक्रमात बदल – तावडे

आपला इतिहास तारखांमध्येच अडकून पडला असल्यामुळे विद्यार्थ्यांवर राष्ट्र आणि देशभक्तीचे संस्कार होत नाहीत. सावरकर यांच्या बाबतीतही नेमके तेच झाले आहे. त्यामुळे सावरकरांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

‘टीकाकारांवर खटले दाखल करावेत’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राष्ट्रभक्ती, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग वादातीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर न्यायालयात खटले चालवावेत, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी रविवारी ठाण्यात केली. गडकरी रंगायतनमध्ये आयोजित सावरकर साहित्य संमेलनात ‘भारतातल्या समाजसुधारणा आणि विविध प्रयत्न’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी भाग घेतला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray on vinayak damodar savarkar
First published on: 24-04-2017 at 01:53 IST