* भाजप आघाडीवर * अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

उल्हासनगर शहरात सत्ता स्थापनेसाठी धडपडणारे भाजप नेते या ठिकाणी आचारसंहिता भंग करीत असल्याचे चित्र आहे. शहरात दोन प्रभागांमध्ये शेकडोंच्या संख्येने पक्षाचे झेंडे उभारल्याचे प्रकरण गाजू लागले आहे. याप्रकरणी महापालिकेच्या निवडणूक पथकाने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, विनापरवानगी भाजपचे झेंडे फडकावूनही हा प्रताप नेमका कुणी केला याचा शोध तपास यंत्रणांना घेता आला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य प्रदर्शित करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. बॅनर, झेंडे, कटआऊ ट आणि इतर साहित्याचे प्रदर्शन करताना यासंबंधीच्या परवानग्या घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंदाच्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेला सोशल मीडियाचा प्रचारही निवडणूक आयोगाच्या रडारवर आहे. सोशल मीडियात पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा फेसबुक िभतीवर प्रचाराची पोस्ट अथवा छायाचित्र टाकण्यासाठी निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. असे असताना उल्हासनगरात मात्र भाजप आणि ओमी कलानी यांच्या  समर्थकांकडून या नियमांचा राजरोसपणे भंग सुरू असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी उल्हासनगर कॅम्प तीन येथील दसरा मैदान परिसरात विजेच्या खांबांवर भाजपचे कमळ चिन्ह असलेले १३५ झेंडे लावण्यात आले. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच कॅम्प तीनमधील सेक्शन २० जवळील बागेजवळ सुमारे ३०० कमळ चिन्हाचे झेंडे लावण्यात आले होते.

समाजमाध्यमांवर परवानगीची गरज

समाज माध्यमांतही यंदा आचारसंहिता नियम लागू होणार असून निवडणूक आयोगाची या स्वस्तातल्या प्रचारावर करडी नजर असणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच समाज माध्यमातील कोणतीही पोस्ट प्रदर्शित करण्यापूर्वी पूर्वपरवानगी अनिवार्य केली आहे. मात्र तरीही अनेक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते बिनधास्तपणे व्हाट्स अ‍ॅप, फेसबुकवर प्रचार करताना दिसत आहेत. यात टीम ओमी कलानी आणि भाजपचेच नेते आघाडीवर असल्याचे दिसते आहे. त्यामुळे अशा पोस्टवर आता निवडणूक आयोग काय कारवाई करते, तेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.