अर्ज बाद झाल्याने ओमींसाठी प्रभाग राखण्याचे आव्हान
उल्हासनगर शहरात गेल्या काही महिन्यांतल्या राजकीय घडामोडींमुळे ओमी कलानी यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून ओमीची घोडदौड किती होते याकडे साऱ्या शहराचे लक्ष प्रभाग क्रमांक सातकडे लागले आहे. येथून ओमी कलानीसमोर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांचे आव्हान असून येथे भालेराव आपल्या पत्नीसह रिंगणात आहेत. येथे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक होते.
पूर्वीपासून हा भाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. पप्पू कलानी आणि कुटुंबाचे वास्तव्य येथेच असलेल्या कलानी महालात आहे. मात्र दलित, बहुजन आणि उत्तर भारतीयांची मतेही मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्या मतांवर नगरसेवक निवडला जाणार आहे. त्यात येथून अर्ज भरलेल्या ओमी कलानी यांचा अर्ज बाद करण्यात आक्षेप घेण्यात भगवान भालेराव आघाडीवर होते.
या लढतीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भर असून मतविभागणीचा फटका कुणाला बसतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्यामुळे भालेराव आणि कलानी यांच्यात पराकोटीचा विरोध या प्रभागात पाहायला मिळणार आहे. कलानी कुटुंबाचे अस्तित्व टिकवण्यासाठी येथे विजय गरजेचा आहे. त्यामुळे रिपाइं आणि सेना युतीचा सामना येथे ओमी कलानी आणि भाजपला करावा लागणार आहे.
प्रभाग क्रमांक- ७
मतदार संख्या :- पुरुष:- १४ हजार ४०७ स्त्री- ८ हजार १४२
एकूण:- २४ हजार ३४३
मतदान केंद्रे :- ३२.
बालेकिल्ल्यात शिवसेनेचा कस
उल्हासनगर : शहरात सिंधीबहुल मतदार मोठय़ा प्रमाणात असतानाही शिवसेनेने येथे सत्ता स्थापन करत अनेक वर्षे सत्ता उपभोगली. शिवसेनेत राजेंद्र सिंह भुल्लर, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे असे काही चेहरे आपले स्थान मजबूत करत पुढे आले. त्यामुळे त्यांचे वर्चस्व शहरातील अनेक भागात आहे. त्यात शहाड स्थानक परिसरही मोडतो. येथे गेल्या काही वर्षांपासून राजेंद्र सिंह भुल्लर यांचे वर्चस्व आहे. यंदा त्यांची पत्नीही रिंगणात आहे. सोबत शिवसेनेच्या वंदना भदाणे आणि रिपाइंच्या ज्योती अहिरे रिंगणात आहेत. शहरात अनेक ठिकाणी शिवसेना भाजपची थेट लढत होणार आहे. पॅनल ३ मध्ये मात्र शिवसेना भाजपला एकमेकांविरोधासह नव्याने स्थापन झालेल्या साई, मनसे आणि अपक्षांच्या युतीचे आव्हान असणार आहे. या पॅनलमध्ये भाजपच्या आशा बिऱ्हाडे, रवींद्र बागूल, चंद्रा टेकचंदानी आणि कुलविंदर सिंग बैंस हे उमेदवार रिंगणात आहेत. तसेच आठ अपक्षांचेही आव्हान असणार आहे. मात्र पाणी प्रश्न, त्याबाबत असलेली मतदारांची नाराजी विविध माध्यमातून अनेकदा दिसून आली आहे. यासह अस्वछता, नाले, फेरीवाले, वाहतूक कोंडी आदी मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. या प्रभागात परप्रांतीय, मुस्लीम समाजाचा वावर अधिक आहे.
शिवसेना उमेदवार
अ ज्योती अहिरे
ब वंदना भदाणे
क चरणजीत कौर भुल्लर
ड राजेंद्र सिंह भुल्लर
भाजप उमेदवार
अ आशा बिराडे
ब रवींद्र बागूल
क चंद्रा टेकचंदानी
ड कुलदीपसिंग बैंस
नवी आघाडी
संजय घुगे, संध्या कंडारे, नासीरउद्दीन चौधरी
’ एकूण मतदार
२० हजार ७३४.
’ पुरुष – ११ हजार ८५९.
’ महिला – आठ हजार ८४७.
’ इतर – २७.
’ मतदान केंद्रे – २८.