‘स्वच्छ भारत’ची जाहिरात; प्रसाधनगृहे मात्र तुंबलेली

मानसी जोशी/आशीष धनगर,

ठाणे : ठाणे जिल्हय़ात एसटी महामंडळाच्या बसगाडय़ांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात असली, तरी एसटी आगार आणि स्थानकांत मात्र स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. स्वच्छ भारत मोहिमेचे फलक स्थानकांत झळकत असताना, प्रत्यक्षात स्थानक परिसर आणि विशेषत स्वच्छतागृहांत मात्र या मोहिमेला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, बदलापूर अशा आगारांत स्थानिक व्यवस्थापनाने मध्यंतरी स्वच्छ भारत  योजनेअंतर्गत स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवली, मात्र आता ही मोहीम बासनात गुंडाळण्यात आली आहे. पुरेशा देखभाली अभावी आगारांतील स्वच्छतागृहांमध्ये असह्य़ दुर्गंधी पसरली आहे. प्रवासी महामंडळाच्या नावे खडे फोडताना दिसत आहेत. या स्थानकांमधून दररोज सव्वादोन लाख प्रवासी ये-जा करतात. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि विठ्ठलवाडी ही सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. तेथील नागरिकांना सुयोग्य स्वच्छतागृहांपासून वंचित राहावे लागत आहे.

अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत. कचराकुंडीचाही अभाव आहे. प्रवाशांपेक्षा बाहेरून जाणारे येणारेच बसस्थानकातील स्वच्छतागृहांचा अधिक वापर करतात. पाणी नसणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून वेळच्या वेळी सफाई केली न जाणे, यामुळे शौचालये अस्वच्छ असतात. त्यामुळे हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अस्वच्छतेमुळे अनेक प्रवासी उघडय़ावरच नैसर्गिक विधी आटोपतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.

विठ्ठलवाडी बस स्थानकात प्रवाशांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाची बिकट अवस्था असल्याने प्रवाशी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर करतात. अधिक प्रवासी भारामुळे आता कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृहाचीही दयनीय अवस्था झाली आहे. बदलापूर पश्चिमेला असलेल्या बस स्थानकातील प्रसाधनगृहात कित्येक वर्षांपासून वीजच नसल्याने प्रवासी रात्री बेरात्री जीव मुठीत घेऊन जातात. या प्रसाधनगृहात जाणे महिलांना असुरक्षित वाटते. त्यामुळे बहुतेक प्रवासी स्वच्छतागृहात जाणे टाळतात.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बस स्थानकांमध्ये अधिक स्वच्छतागृहांची आवश्यकता असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आहे त्या स्वच्छतागृहांकडेही पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची टीका प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

 

प्रवासी संख्या

बस स्थानके                          रोजचे प्रवासी

ठाणे १

(वंदना, ठाणे रेल्वे स्थानक)       ३७०८४

ठाणे २ (खोपट)                         ३०३२८

भिवंडी                                       ३२१३६

शहापूर                                       २५३१०

कल्याण                                     २३४५१

मुरबाड                                      ३७७३८

विठ्ठलवाडी                                १७७९२

प्रवासी संख्या वाढल्याने स्वच्छतागृहे अपुरी ठरत आहेत. स्थानकाच्या आसपास राहणारेही या स्वच्छतागृहांचा वापर करतात. प्रवासी दहा टक्के असतील तर बाहेरील नागरिक ९० टक्के असतात. स्वच्छता ही केवळ कर्मचाऱ्यांचीच नव्हे, तर नागरिकांचीही जबाबदारी आहे. अनेकदा नागरिक पान-गुटखा खाऊन थुंकतात. खाद्यपदार्थाची वेष्टने स्वच्छतगृहात टाकतात. त्यामुळे स्वच्छतागृह तुंबते.   

– अभिजीत भोसले, साहाय्यक जनसंपर्क अधिकारी

बस स्थानकातील स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे मी तिथे जाणे टाळतो. सगळीकडे स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. स्वच्छ भारत अभियानाचे फलक सगळीकडे दिसून येतात. मात्र, परिवहन मंडळाच्या आगारातील स्वच्छता केवळ कागदावरच दिसते. 

– प्रसाद चव्हाण, प्रवासी