ठाणे : स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी गावदेवी मैदानात उभारण्यात आलेल्या भूमिगत वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या वाहनतळाचे १ मे रोजी लोकार्पण करण्यासाठी पालिकेच्या प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने वाहनतळाचा ठेका देण्यासाठी निविदा काढली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे नागरिक रस्त्याकडेला वाहने उभी करतात. या वाहनांचा वाहतुकीस अडथळा होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या भागातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहावेत आणि नागरिकांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच पालिकेने स्मार्ट सिटी योजनेतंर्गत गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळाची उभारणी केली आहे. हे वाहनतळ ४,३३० चौरस मीटरचे असून त्यामध्ये १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे. हे काम डिसेंबर २०२१ पर्यंत करण्याचा पालिकेचा मानस होता. परंतु करोना काळात प्रकल्पाच्या कामाचा वेग मंदावल्यामुळे डिसेंबर महिन्यात काम पूर्ण होऊ शकले नाही. गेल्या काही महिन्यांपासून पालिकेने या कामाचा वेग वाढविला असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
सद्य:स्थितीत वाहनतळाच्या छताचे वाटरप्रूफिंगचे काम सुरू असून हे काम ७५ टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. उर्वरित काम झाल्यानंतर वाहनतळावरील मैदान पूर्ववत करम्ण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण करून येत्या १ मे रोजी या वाहनतळाचे लोकार्पण करण्यासाठी पालिकेच्या प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. लोकार्पण झाल्यानंतर वाहनतळ सुरू करण्यास उशीर होऊ नये म्हणून पालिकेने वाहनतळाचा ठेका देण्यासाठी निविदा काढली आहे.
पार्किंगचे दर यापूर्वीच निश्चित
वाहनतळातील विद्युत देयके, देखभाल व दुरुस्ती अशी कामे ठेकेदाराला करावी लागणार आहेत. वाहनांकडून किती पैसे आकारायचे याचे दर पालिका देणार आहे. यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने पार्किंगचे दर निश्चित केले असून त्याप्रमाणे पार्किंगचे दर आकारले जाणार आहेत. तसेच जो ठेकेदार उत्पन्नातील जास्त वाटा महापालिकेला देईल, त्याला कामाचा ठेका दिला जाणार आहे. यामुळे पालिकेला उत्पन्न मिळणार आहे, असे पालिका सूत्रांनी सांगितले.