ठाणे : राज्यात २०१४च्या विधानसभेचे निकाल येत असताना ‘सिल्व्हर ओक’ बाहेर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल, तत्कालीन प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा का केली होती, यामागची कारणे आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला सांगावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमी अर्धसत्य सांगत असतात. जनतेची दिशाभूल करायची हा त्यांचा स्थायीभाव आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी अलिबागला हाॅटेल रविकिरण येथे खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय आढावा बैठक झाली. यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी मी समाजमाध्यम प्रमुख असल्याने त्याचे सादरीकरण दिले होते. तत्त्कालीन प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदारांची गुप्त बैठक घेतली नव्हती. त्यामुळे या बैठकीत भाजपाबरोबर जाण्याबाबत विषयही झाला नाही अथवा चर्चाही झाली नाही, असा दावा परांजपे यांनी केला.

हेही वाचा – टेंभीनाक्यावरील नवरात्रोत्सवात श्रीराम मंदिराची प्रतिकृती

याउलट २०१४ च्या विधानसभेचे निवडणूक निकाल येत असताना, सिल्व्हर ओक बाहेर पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघाचा निकाल आला नव्हता. भाजपा १२२ पर्यंत पोहोचलादेखील नव्हता. राष्ट्रवादीचे किती निवडून आले ही संख्या माहीत नव्हती, शिवसेनेचे किती निवडून आले हे माहीत नव्हते. अशावेळी विधानसभा निवडणुकीचा निकालाचा निर्णय येण्यापूर्वी ‘सिल्व्हर ओक’ला राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल व तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा दिल्यामागची कारणे जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला सांगावीत, असे उघड आव्हान आहे.

हेही वाचा – कल्याण : दुहेरी हत्येच्या आरोपातील सहा जण निर्दोष, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा २०१४ च्या निवडणुका होण्याआधी कोणतीही गुप्त बैठक झाली नव्हती. खोट बोल पण रेटून बोल आणि माझ्याभोवती राजकारण फिरले पाहिजे, पक्षापेक्षा मी मोठा हा जितेंद्र आव्हाड यांचा स्थायीभाव आहे. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून का गेले ? याचा विचार त्यांनी करावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आताचे आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्याबद्दल कोणतेही खोटे आरोप करू नका, त्याचे जशास तसे उत्तर आम्हालादेखील देता येते. इतिहासाची मोडतोड करून वास्तव बदलून आपण काहीही साध्य करणार नाही, असे आनंद परांजपे म्हणाले.