कल्याणमध्ये तीन केंद्रांमध्ये वाढ

ठाणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार आज, गुरुवारपासून ४५ वर्षांपुढील व्यक्तींना करोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार असून यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा तसेच पालिका प्रशासनाने लसीकरण मोहिमेचा फेरआढावा घेऊन नव्याने नियोजन केले आहे. त्यामध्ये ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली नसून या ठिकाणी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळेच केंद्रांची संख्या वाढविण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर कल्याण-डोंबिवली शहरात मात्र तीन केंद्रे वाढविण्यात आली असून जिल्ह्य़ातील एकूण ११२ केंद्रांवर लसीकरण होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

केंद्र शासनाने १ एप्रिलपासून ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना लस देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा भार वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर जिल्हा तसेच पालिका प्रशासनाने लसीकरण मोहिमेचे फेरनियोजन केले आहे. मात्र, उपलब्ध साठा कमी असल्यामुळे जिल्ह्य़ात लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली नाही. ठाणे पालिका क्षेत्रात एकूण ५१ पालिकेची तर ११ खासगी केंद्रे आहेत. त्यापैकी ३१ पालिकेच्या आणि ११ खासगी केंद्रांवर लस दिली जाणार असून पालिकेकडे सद्य:स्थितीत २४ हजारांच्या आसपास लशीचा साठा उपलब्ध आहे. कडोंमपा क्षेत्रात १२ लसीकरण केंद्रे आहेत. आता तीन नवीन केंद्रे सुरू केली असून पालिकेकडे १५० कोव्हॅक्सिन आणि ६५० कोव्हिशिल्ड लशींचा साठा उपलब्ध आहे.

भिवंडी शहरात तीन लसीकरण केंद्रे असून पालिकेकडे तीन हजार लशींचा साठा उपलब्ध आहे. उल्हासनगर शहरात कॅम्प तीन भागातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि पालिका शाळा क्रमांक २८ येथे मोफत लसीकरण केले जात आहे. अंबरनाथ शहरात आयुध निर्माण संस्था येथे लसीकरण केले जाते. शहरातील हे एकमेव लसीकरण केंद्र असून या ठिकाणी दररोज २०० लस देण्याची क्षमता आहे. ही क्षमता ३०० पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. तर कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात चार ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू असून यात पालिकेच्या कै. दुबे रुग्णालयात, ग्रामीण रुग्णालयात, बदलापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आणि सापे येथील सेंट्रल रुग्णालयात खासगी पद्धतीने लसीकरण केले जात आहे. सध्या शहरात दररोज २०० नागरिकांना लस देण्याची क्षमता आहे. ही क्षमता वाढविण्याची शक्यता आहे. शहरात ५०० लशींचा साठा उपलब्ध आहे.