ठाण्यात दोन दिवसांत दोन कार्यालयांतून दागिने लंपास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोर कोकणे, ठाणे</strong>

मंगल कार्यालयांमध्ये होणाऱ्या लग्नसोहळ्यांमध्ये होणारी धावपळ, गोंगाट आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी आता येथे घुसून दागिने तसेच मौल्यवान ऐवज लंपास करण्याचे सत्र आरंभले आहे. ठाणे शहरात अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या असून त्यात जवळपास सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. या चोरटय़ांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी लग्न सोहळ्यादरम्यान केलेले चित्रीकरण तपासले असून त्यामध्ये चोरटे थेट वधू-वरासाठी असलेल्या व्यासपीठावर वावरताना दिसून आले आहेत.

ठाणे तसेच घोडबंदर परिसरात मंगल कार्यालये असून त्याचबरोबर शहरातील हॉटेलमध्येही लग्न सोहळे पार पडतात. नोव्हेंबर महिन्यापासून लग्न सोहळ्यांना सुरुवात झाली असून त्यासाठी शहरातील मंगल कार्यालये आणि हॉटेल हाऊसफुल्ल झाली आहेत. या लग्न सोहळ्यांमध्ये नातेवाईक आणि आप्तेष्ट उपस्थित राहतात. या सोहळ्यांना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे आता मंगल कार्यालयात शिरून सोन्याचे दागिने लंपास करू लागले आहेत. ठाणे आणि घोडबंदर भागात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिली घटना १९ नोव्हेंबरला ओवळा येथील एका मंगल कार्यालयात घडली. येथे डोंबिवली येथील एका तरुणीचा विवाह सोहळा पार पडला. वधूच्या पालकांनी तिला भेट देण्यासाठी ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बनविले होते. हे दागिने वधूच्या आईने एका बॅगेत ठेवले होते.  ती मुलगी आणि जावई या दोघांसोबत छायाचित्र काढण्यासाठी व्यासपीठावर गेली. त्या वेळेस तिने दागिन्यांची बॅग सोफ्यावर ठेवली.

या कार्यालयात शिरलेल्या चोरटय़ांनी ही बॅग लंपास केली. छायाचित्र काढून झाल्यानंतर त्या मुलीला भेटवस्तू देण्यासाठी बॅग घेण्याकरिता गेल्या. त्या वेळेस बॅग चोरीला गेल्याची बाब समोर आली. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना श्रीनगर परिसरात घडली आहे. वागळे इस्टेट परिसरातील एका महिलेच्या चुलत भावाचे लग्न २३ नोव्हेंबरला झाले. या सोहळ्यादरम्यान त्यांनी एका पर्समध्ये ठेवलेले ४८ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत.

या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे शहरातील मंगल कार्यालयांमध्ये चोरटय़ांचा सुळसुळाट झाल्याचे उघड होत आहे.

सीसीटीव्ही चित्रीकरणाची मदत

सीसीटीव्ही कॅमेरे, लग्न सोहळ्यातील छायाचित्र आणि चित्रीकरण पोलिसांनी तपासले असून त्यामध्ये चोरटे पोलिसांना दिसले आहेत. वागळे इस्टेट आणि कासारवडवली या दोन्ही ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये चोरटे वेगवेगळे आहेत की एकच आहेत, याचा शोध घेतला जात आहे. तसेच चोरटय़ांना लवकरच अटक केली जाईल, असे कासारवडवली पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कार्यपद्धत अशी..

एखाद्या मंगल कार्यालयात किंवा हॉटेलमध्ये विवाह सोहळा सुरू असेल तर त्या ठिकाणी चोरटे वऱ्हाडी म्हणून आतमध्ये शिरकाव करतात. नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळींच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाइल आणि खिशातील पैसे यावर चोरटे नजर ठेवतात आणि संधी मिळताच चोरी करून तेथून पसार होतात, अशी चोरटय़ांची कार्यपद्धती असल्याचे उघड झाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valuables jewelry stolen from two wedding halls in thane zws
First published on: 26-11-2019 at 04:00 IST