किरकोळ भावात का होईना फुले बाजारात जाऊ लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : टाळेबंदीमुळे मागील दोन महिन्यांपासून फुलशेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात जात नसल्याने शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडले होते मात्र, टाळेबंदीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात शिथिलता मिळाली असल्याने फुलांचा शेतमाल हा मुंबईच्या ठिकाणी ठरलेल्या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी जाऊ  लागला आहे त्यामुळे किरकोळ भावात का होईना पण फुलांचा माल हा बाजारात गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे.

वसईच्या बहुतांश भागात फुलांची लागवड केली जाते. त्यामध्ये चाफा, मोगरा, सायली, जुई, तगर, गुलाब, जास्वंद, नेवाली अशा विविध प्रकारच्या फुलांच्या समावेश आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून करोना विषाणूच्या संकटामुळे धार्मिक स्थळे बाजारपेठा सर्व काही बंद असल्याने तयार झालेल्या फुले झाडावरच कोमेजून जाऊ लागली होती यामुळे अनेक बागायतदार शेतकऱ्यांना लाखोचा फटका बसला आहे.

मागील काही दिवसांपासून बाजारपेठा जरी बंद असल्या तरी आता वसईच्या भागातील फुलशेतकऱ्यांचा शेत माल हा कायमस्वरूपी व्यापारी व ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. टाळेबंदीमुळे सर्वच माल खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत होता. परंतु आता ५० टक्क्यांहून कमी दराने मालाची विक्री करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सर्व बाजूने नुकसान होण्यापेक्षा जे काही हाती येईल त्यातून किमान मशागतीचा खर्च निघेल या आशेवर आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन फुलांचा माल हा मुंबईच्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत.

फुलांचे भावही गडगडले

ऐन सणासुदीच्या हंगामात फुलांच्या मालाला चांगली मागणी होती मात्र, टाळेबंदीमुळे लाखो रुपयांच्या उत्तपन्नावर पाणी सोडावे लागले आहे. आता सर्व काही बंद असल्याने फुलांचे भावही गडगडले आहेत. जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी फुलांचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे मिळेल त्या भावात फुलांची विक्री करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

मागील दोन महिन्यांपासून फुलशेतीचे नुकसान झाले होते आता आम्ही वसईतील शेतकरी एकत्र  येऊन जे कायमस्वरूपी व्यापारी ग्राहक आहेत त्यांना माल पोहोचवत आहोत. त्यामुळे थोडय़ाफार प्रमाणात विक्री होत असल्याचे समाधान वाटत आहे.

– लिनस दिब्रिटो, फुलशेतकरी, वसई

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai flowers started going to mumbai based traders for sale zws
First published on: 20-05-2020 at 04:06 IST