पोलिसांच्या मदतीने तरुणाला धडा

प्रेयसीने भेटण्यास नकार दिला म्हणून तिचे फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देणाऱ्या प्रियकराला पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. हा प्रियकर तिच्यावर भेटण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र पोलिसांच्या सहाय्याने तिने या तरुणाला चांगलाच धडा शिकवला.

वसईच्या अंबाडी येथे राहणाऱ्या या २० वर्षीय तरुणीचे तिच्याच महाविद्यालयातील एका तरुणाशी प्रेमसंबध होते. मात्र त्याच्या विक्षिप्त स्वभावाला कंटाळून तिने त्याच्याशी संबधे तोडले होते. याचा राग मनात ठेऊन तो तिला धमकावत होता. भेटायला आलीस नाही तर फोटो इंटरनेटवर टाकेन अशी धमकी तो तिला द्यायचा.  तरुणीने अनेक विनंत्या करुनही त्याच्या वर्तनात काहीच बदल न झाल्याने ती तणावाखाली होती. अखेरीस या त्रासाला कंटाळून तिने तुळींच पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला या तरुणाला अटक करण्याचे आदेश दिले. या तरुणाने तिला भेटण्यासाठी बोलवले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश साखळकर यांच्या पथकातील भास्कर कोठारे, संदीप शेरवले यांनी सोमवारी दुपारी संतोष भुवन येथे सापळा लावला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवल्या व त्याला अटक केली.

महिलांसंदर्भातील सर्व तक्रारींची पोलीस प्राधान्याने दखल घेतात. कुणी त्रास देत असल्यास अथवा ब्लॅकमेल करत असल्यास त्यांच्या दबावाला बळी न पडता पोलिसांशी संपर्क साधावा

प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक