कार्ड स्वाइप करून शिधावाटप दुकानांमधून धान्य मिळणार; धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या दुकानातून वस्तू खरेदी करताना आपल्याकडे जर पैसे नसतील तर आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप करून बिल अदा करतो. हाच प्रकार आता वसईतील शिधावाटप (रेशनिंग) दुकानांमध्येही पाहायला मिळणार आहे. वसईतल्या नागरिकांच्या जुनाट शिधापत्रिका हद्दपार होणार असून शिधापत्रिकाधारकांना आता आकर्षक स्मार्टकार्ड मिळणार आहे. या स्मार्ट शिधापत्रिका घेऊन शिधावाटप दुकानांमध्ये गेलात तर त्या स्वाइप करून धान्य मिळवता येणार आहे. सर्व शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंदणी झाली असून नवीन वर्षी नागरिकांना या स्मार्ट शिधापत्रिका मिळणार आहेत. यामुळे धान्याचा काळाबाजार रोखला जाऊ  शकणार आहे.

वसईची लोकसंख्या २० लाखांच्या घरात पोहोचली आहे. सध्या वसई-विरार शहरात साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी एक लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला शुभ्र रंगाची, तर एका लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना केशरी रंगाची शिधापत्रिका मिळते. केशरी रंगाची शिधापत्रिका असणाऱ्या ज्या कुटुंबाचे उत्पन्न ५९ हजारांच्या खाली असते, त्यांना प्राधान्य कुटुंब म्हणतात, तर १५ हजारांच्या खाली उत्पन्न असणाऱ्यांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका देण्यात आलेली आहे. त्यांना अंत्योदय वर्ग म्हणतात.

वसई तालुक्यात ३ लाख ३२ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. धान्य आणि केरोसीन वाटप करण्यासाठी १७९ शिधाकेंद्रे आहेत. या तीन लाख ३२ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी एक लाख १३ हजार शिधापत्रिकाधारक प्राधान्य कार्ड वर्गवारीत आहेत. या शिधावाटप दुकानांत मोठय़ा प्रमाणात धान्याचा काळाबाजार होत असतो. ते रोखण्यासाठी शिधापत्रिका स्मार्टकार्डमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहे. याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे.

योजनेचे फायदे

* लाभार्थ्यांनाच धान्य मिळेल

* धान्याचा काळाबाजार रोखला जाऊ  शकेल.

*  नोंद ऑनलाइन असेल. त्यामुळे लाभार्थी कुटुंबाला धान्य मिळाले की नाही त्याची नोंद पुरवठा खात्याकडे राहणार आहे

कशा असतील स्मार्ट शिधापत्रिका?

* स्मार्ट शिधापत्रिका एटीएमकार्डाच्या आकाराच्या असतील आणि पाकिटात मावू शकतील.

* त्या टिकाऊ  असणार आहेत.

* अनेकदा शिधापत्रिका फाटतात, त्याची पाने गहाळ होतात आणि मग अनेक समस्या निर्माण होतात. त्या त्रासापासून मुक्तता होणार आहे.

सर्व शिधापत्रिकाधारकांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण होत आली आहे. त्यापैकी ८४ टक्के शिधापत्रिका आधारकार्डाला संलग्न असतील. ज्या व्यक्तीकडे स्मार्टकार्ड असेल, केवळ तीच व्यक्ती शिधावाटप केंद्रात जाऊन कार्ड स्वाइप करून धान्य घेऊ  शकेल. त्या व्यक्तीला दुकानात असलेल्या थंब मशिनमध्ये हाताचा ठसा उमटवावा लागेल.

– प्रदीप मुकणे, नायब तहसीलदार

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai residents will get ration from smart card
First published on: 15-12-2016 at 03:04 IST