वसई तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. अर्नाळा किल्ला आणि अर्नाळ्याची चौपाटी यामुळे वसई तालुक्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु वसई शहरात असलेल्या सुरूची बाग समुद्रकिनाऱ्यावर सहसा पर्यटकांचे लक्ष जात नाही. अतिशय रमणीय असलेल्या या चौपाटीवर क्षणभर विसावलात तर मनास प्रसन्न वाटते आणि सागरसफरीचा आनंदही मिळतो.

सुरूची बाग म्हटले की येथे कोणती बाग आहे का, असा प्रश्न पडणारच! कारण येथील समुद्रकिनाऱ्यावर सुरूची असंख्य झाडे उभी आहेत. सुरूच्या झाडांमुळेच या समुद्रकिनाऱ्याला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. वसई रोड रेल्वे स्थानकावरून रिक्षाने सुरूची बाग समुद्रकिनारी गेलो, तर रिक्षावाला समुद्र किनाऱ्यापर्यंत येत नाही. एक किलोमीटर आधीच एक गेट लागतो आणि तेथून चालत, रमतगमत सागरसफरीचा प्रवास सुरू होतो. सरळ जाणारी वाट आणि बाजूला खारफुटी व कांदळवन! यातून मार्ग काढत आपण समुद्रकिनाऱ्यापर्यंत जातो. पण आधी समुद्रकिनाऱ्यावरील सुरूची झाडे डोकावू लागतात. या सुरूच्या झाडांखाली विसावा घेण्याचे आणि छायाचित्र काढून घेण्याचा मोह टाळता येत नाही. सुरूच्या वनात येणारा समुद्राचा आवाज आकर्षित करतो आणि या वनातील वाटेवरून आपली पावले समुद्राच्या दिशेने निघतात.

हा समुद्रकिनारा सरळसोट आणि विस्तीर्ण आहे. साप्ताहिक सुटीच्या दिवशी स्थानिकांशिवाय जास्त पर्यटकांची येथे गर्दी नसते. त्यामुळे समुद्रकिनारा जरा स्वच्छ वाटतो. समुद्रकिनारी बऱ्याचदा तरुण जोडपी बसलेली दिसून येतात. संध्याकाळच्या वेळेला लहान मुले येथे खेळताना दिसून येतात. त्यांच्यासाठी घोडेस्वारी आणि घोडागाडीची येथे सोय आहे. घोडय़ावरून समुद्रकिनारी रपेट मारण्यात एक वेगळाच आनंद मिळतो.

खवय्यांसाठीही या समुद्रकिनारी विविध खाद्यपदार्थाची रेलचेल आहे. विविध खाऊचे स्टॉल येथे पाहायला मिळतात. चौपाटी म्हटले की भेलपुरी आलीच. त्यामुळे भेलपुरी खात चौपाटीवर काही क्षण विसावण्याचा आनंद पर्यटक घेतो.  त्याशिवाय वडापाव, पाणीपुरी, शेवपुरी, बर्फगोळा आणि नारळपाणी यांचाही आस्वाद घेत पर्यटक समुद्रकिनारी फिरू लागतो. संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताचे रमणीय दर्शन येथे होते. भगव्या-तांबडय़ा रंगांचा नजारा आकाशात नजर खिळवून ठेवतो.

किनाऱ्यावरील सुरूची झाडे वाऱ्यासोबत हलताना खूपच छान दिसतात. संगीताच्या तालावर नाचतात.. कधी कधी समुद्राच्या विरुद्ध बाजूस कललेली दिसतात. एकूणच सुरूची बाग चौपाटी हे नावच या किनाऱ्याला उठून दिसते.. जणू वसई शहराच्या गळ्यातील सुवर्णहारच!

सुरूची बाग चौपाटी, वसई

कसे जाल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • वसई रोड स्थानकाबाहेरून पश्चिमेला चौपाटीकडे जाण्यासाठी रिक्षा मिळतात.
  • ठाणे स्थानकाबाहेरील एसटी स्टँडमधून वसईला जाण्यासाठी एसटीची सोय आहे. महापालिकेच्या गाडय़ाही वसईला जातात.
  • कल्याण एसटी स्टँडमधून वसईला जाण्यासाठी एसटी बसची सोय आहे.