वसंत व्हॅली, कल्याण (प)
सकाळी फिरायला जाणे हा आता केवळ व्यायामाचा प्रकार राहिलेला नाही. मधुमेही आणि इतर आजारी लोकांसाठी ते एक नियमित औषध आहे. तरुण मंडळी केवळ हौस म्हणून ट्रॅक सूट घालून सध्याच्या थंडीच्या दिवसात फिरायला जातात. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालणे हे शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा उत्तम उपाय आहे. सकाळीच शरीरातील घाम गाळला की दिवसभर ताजेतवाने वाटते.
नवीन कल्याण परिसरात वसंत व्हॅली हे सकाळी फिरायला जाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या परिसरात उच्च मध्यमवर्गीयांची मोठय़ा प्रमाणात वस्ती आहे. दोन्ही बाजूला असलेल्या बहुमजली इमारतींमधून जाणाऱ्या वाटेवर सकाळी लोक फेरफटका मारतात. त्यानंतर दिवसभर या वाटेचा रहदारीसाठी वापर होतो. डी. बी. रोड ते वसंत व्हॅली अशा तीन किलोमीटर रस्त्यावर लोक फेरफटका मारतात. निरनिराळ्या फळांचे रस इथे सकाळी उपलब्ध असतात.
नवीन कल्याणमधील नागरिक फावल्यावेळी वसंत व्हॅली चौकात येतात. या ठिकाणी बऱ्यापैकी हिरवळही आहे. काही आपल्या घरातील पाळीव श्वानांना फिरायला घेऊन येतात. काही लोक इथे वाहन चालवायला शिकत असतात. इथेच हास्य क्लबही कार्यरत असतो. याबाबत अधिक माहिती देताना वसंत हास्य क्लबच्या प्रभाकर देशपांडे यांनी सांगितले, आम्ही गेली दोन वर्षे नियमितपणे भेटतो. आमच्या क्लबमध्ये साधारणत: ४५ ते ७५ वयोगटांतील नागरिक आहेत. हास्य विनोदाने मनावरील ताण हलके होतात. दीर्घायुष्य लाभते. साधारण सहा वाजता आमचा हास्यदरबार भरतो. तासाभरानंतर आम्ही फेरफटका मारून निघतो. सकाळीच मिळालेल्या या टॉनिकने दिवसभर ताजेतवाने वाटते. हास्यविनोदासोबतच ध्यानधारणेचा आनंद घेत असल्याचे येथील ध्यानधारणा क्लबच्या सदस्या वृषाली नेने यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सकाळच्या शांत वेळी आम्ही काही मैत्रिणी ध्यानधारणा करतो. आम्ही सर्व नोकरी करणाऱ्या आहोत. मोबाइलवर हळू आवाजात संगीत लावून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो.
दुपारी मात्र उच्छाद
वसंत व्हॅली परिसर रमणीय आहे. शहरातील इतर विभागांच्या तुलनेत इथे खूपच शांतता आहे. सकाळी साधारण पाच ते आठ या वेळेत विविध वयोगटांतील नागरिक इथे फेरफटका मारतात, त्यात वावगे काहीच नाही. मात्र दुपारी मात्र येथे तरुण-तरुणींचे घोळके रेंगाळत असतात. त्यांच्या गोंगाटाने येथील शांततेचा भंग होतो. स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास होतो. अग्रवाल आणि बिर्ला अशी दोन महाविद्यालये इथून जवळच आहे. काही महाविद्यालयीन तरुण इथे दारू-सिगारेट पीत असतात अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याला याची कल्पना दिल्यानंतर आता इथे पोलीस बंदोबस्तही असतो.
दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करत असल्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे गेली काही वर्षे सकाळी नियमितपणे चालायला येतो. पूर्वी आम्ही काळा तलाव इथे जात होतो, मात्र तिथे गर्दी वाढल्याने आता इकडे येत आहोत.
– मोहन व्यवहारे, वायलेनगर
मी कल्याण भिवंडी मार्गावर असलेल्या कोनगाव येथे राहात असलो तरी कल्याण येथील वसंत व्हॅली येथे दररोज व्यायाम करण्यासाठी येतो. व्यायाम म्हणजे नुसते चालणे नाही तर त्याच्या बरोबरीने योगसाधना, कवायती करणेही गरजेचे आहे. आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे.
– जावेद कोठावळे
सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे विसरून चाललो आहोत. त्यामुळे थोडे चाललो तरी आपल्याला अनेकदा दम लागतो. मी दररोज संध्याकाळी किमान अर्धा तास तरी चालतो. चालण्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नाही. दररोज पाच किलोमीटर चालल्यास आरोग्य ठणठणीत राहते. साधारणपणे रोज तीस मिनिटे चालल्यास दोनशे कॅलरी खर्च होतात. पाठीचे दुखणे, हृदयरोग, उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास हे सर्व नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणे फायदेशीर ठरते.
-सचिन बत्तालवार
शरीर आणि मन निरोगी राखण्यासाठी नियमित चालणे आवश्यक आहे. सकाळी येथील निसर्गरम्य वातावरणात चालणे होत असल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते.
– रश्मी पटवर्धन, कल्याण
सकाळी फिरण्यात सातत्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीरातील उत्साह कायम राहतो. वजन नियंत्रित राहते. मुख्य म्हणजे मनाला खूप प्रसन्न वाटते.
– रुपश्री देवरुखकर