भाजी घेण्यासाठी जवळच्या मंडईत जाण्यापेक्षा ठाणे स्टेशन गाठणे डोंबिवलीकरांना आता अधिक सोयीचे ठरू लागले आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती हाकेच्या अंतरावर असतानाही डोंबिवली, कल्याण शहरांतील किरकोळ बाजारात भाज्या अवाच्या सव्वा दराने विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे, कल्याण आणि वाशी या दोन्ही ‘एपीएमसी’पासून लांब असतानाही ठाण्यात मात्र डोंबिवलीपेक्षा भाजी स्वस्त आहे.
डोंबिवली शहरापासून काही अंतरावर असलेल्या कल्याण शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून भाज्या येतात आणि त्यांची घाऊक भावात मोठय़ा प्रमाणात विक्री होते. मुंबई-ठाण्यातील भाजीविक्रेते कल्याणमधून घाऊक दराने भाजी खरेदी करून नेत असतात. त्यात आपला नफा आणि वाहतूक खर्च जोडून चढय़ा दराने किरकोळ बाजारात भाजी विकली जाते, मात्र कल्याण एपीएमसी जवळ असतानाही डोंबिवलीच्या किरकोळ बाजारांत अवाच्या सव्वा दराने भाजी विकली जाते.  पुणे, नाशीक tv05जिल्ह्यातून मुंबई, कल्याणच्या घाऊक बाजारात आयात होणाऱ्या भाज्यांचे दर काहीही असोत कल्याण, डोंबिवलीच्या किरकोळ मंडयांमध्ये गवार, भेंडी, फरसबी, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची अशा प्रमुख भाज्या किलोमागे ६० ते ८० रुपये दराने विकल्या जातात. याशिवाय अन्य भाज्याही दुप्पट आणि तिप्पट दराने विकल्या जात असल्याचे दिसून येते.
‘ग्राहकांना ताजी भाजी हवी असते. पुणे जिल्ह्यातील भाजी तुलनेने ताजी आणि स्वस्त असते. त्यामुळे आम्ही तेथून भाजी आणतो. प्रवास खर्च, गाळा भाडे, मजुरी हे सर्व जाऊन आम्हालाही काही नफा झाला पाहीजे,’ असा दावा एकनाथ गोरे या किरकोळ भाजी विक्रेत्याने केला. दरम्यान, प्रवास खर्च, पेट्रोल डिझेलचे कमी जास्त होणारे दर, गाडी भाडे व मजुरी याचे कारण पुढे केले जात असले तरी, डिझेल पेट्रोलचे दर कमी झाल्यावर भाजीचे दर कमी होणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही. शहरात नोकरदार वर्ग जास्त असल्याने सायंकाळी घरी जाण्याच्या घाईगडबडीत विक्रेते सांगतील त्या दरात ग्राहक भाजी खरेदी करत आहेत.
पुणे, कल्याण आणि वाशी मार्केटमधून भाज्या आणण्याचा प्रवास खर्च आणि मजुरी जास्त असल्याने भाज्यांचे भाव जास्त असल्याचे जयमल्हार भाजी विक्रेते नितीन आव्हाड यांनी सांगितले. मात्र ठाण्यातील गोखले रोड, नौपाडा, तलावपाळी यासारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजारांमध्ये उत्तम दर्जाची भाजी डोंबिवलीच्या तुलनेत स्वस्त असल्याचे आढळून येते. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला व्यापारी बाबाजी पोखरकर यांनी किरकोळ बाजारात भाजी महाग होण्याला प्रवास दर, मजुरी, विक्रेत्यांचा नफा या गोष्टी जबाबदार असल्याचे म्हटले. मात्र, घाऊक आणि किरकोळ बाजारांतील भाज्यांच्या दरात फारच तफावत असल्याचेही त्यांनी मान्य केले.
 दरम्यान, होळीनंतर भाज्यांची आवक कमी होत असल्याने त्या काळात भाज्या दुपटीने महाग होतील, असा अंदाज आव्हाड यांनी व्यक्त केला.
शर्मिला वाळुंज, डोंबिवली