डोंबिवली स्थानक परिसरात वाहनांची गर्दी

डोंबिवली शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करून नियोजनकारांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात वाहनतळांसाठी चार आरक्षणे विकास आराखडय़ात प्रस्तावित केली होती. आराखडा अस्तित्वात येऊन २० वर्षे उलटली तरी महापालिकेने या जागेचा शोध घेतला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळ नसल्याने रस्ते, गल्लीबोळ वाहनांनी गजबजून गेलेले असतात.
विकास आराखडय़ात डोंबिवली पूर्व भागात आरक्षण क्र. ८७, ८८, ९०, ९१ प्रस्तावित केली आहेत. बाजीप्रभू चौक, चिमणी गल्ली भागात वाहनतळांची दोन आरक्षणे आहेत. तर उर्वरित दोन आरक्षणे रेल्वे मार्ग आणि पश्चिम भागातील रेल्वे मार्गाने व्यापले आहे, असे आराखडय़ातील नकाशावरून दिसून येते. ही आरक्षणे विकसित झाली असती तर पूर्व, पश्चिम भागात वाहनतळे नसल्याने मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूला, गल्लीबोळ, पदपथावर वाहने उभी करून ठेवण्याचे प्रकार कमी झाले असते.

वाहनतळाच्या जागेवर मंडई
पी. पी. चेंबर्स मॉलची जागा ठेकेदाराला पालिकेने विकसित करण्यासाठी दिली आहे. ‘पालिका उपयोगितेसाठी आणि भांडार’ असे आरक्षण या जागेवर होते. ते आरक्षण नंतर पालिकेने बदलून त्या ठिकाणी भाजी मंडई असे आरक्षण प्रस्तावित केले. रेल्वे स्थानक परिसरात सुसज्ज वाहनतळ पाहिजे म्हणून तत्कालीन दिवंगत नगरसेवक नंदकिशोर जोशी, वास्तुविशारद लक्ष्मण पाध्ये यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेदरम्यान महापालिकेच्या नगररचना विभागातील नगररचनाकार व आताचे ‘फ’ प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी किरण वाघमारे यांनी उच्च न्यायालयात सत्य प्रतिज्ञापत्राद्वारे एक माहिती दिली होती. त्यात वाघमारे यांनी पालिकेची बाजू मांडताना म्हटले होते, की रेल्वे स्थानक परिसरात भाजी मंडई नाही. मंडई नसल्याने फेरीवाले, विक्रेते रस्ते अडवून व्यवसाय करतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडीसारखे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे नियोजनकारांनी आराखडय़ात ‘म्युनिसिपल पर्पज अ‍ॅण्ड स्टोअर’च्या ऐवजी भाजी मंडई हे आरक्षण पी. पी. चेंबर्स मॉलच्या जागेवर प्रस्तावित केले आहे. उर्सेकरवाडी, नेहरू रस्त्यावर दोन भाजी मंडई असताना पालिकेने न्यायालयाला त्या वेळी दिशाभूल करणारी माहिती दिली म्हणून याचिकाकर्त्यांनी त्याला हरकत घेतली होती.
विकास आराखडय़ातील नियोजनाप्रमाणे आरक्षणे विकसित झाली असती तर शहराचे बकालपण कित्येक पटींनी कमी झाले असते. आता आरक्षणच आहेत कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानक भागात वाहनतळांची योग्य रचना आहे. फक्त त्याचा विकास केला जात नाही, याचे आश्चर्य वाटते.
– लक्ष्मण पाध्ये, वास्तुविशारद