भिवंडी पोलिसांकडून गोदामाची पाहणी
ठाणे : करोना विषाणूच्या संसर्गाची लागण होऊ नये म्हणून नागरिक मास्कचा वापर करत असतानाच, भिवंडीतील एका गोदामामध्ये परदेशात वापरलेल्या मास्कची धुवून वाढीव दराने विक्री केली जात असल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन भिवंडी पोलिसांनी याप्रकरणी जिल्हा आरोग्य विभागाला पत्र पाठविले असून त्यात चित्रफितीतील वृत्ताची सत्यता तपासण्यासाठी गोदामाची पाहाणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
भिवंडीतील दापोडा भागामधील एका गोदामात मास्कचा साठा ठेवण्यात येतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत मास्कची मागणी वाढल्याचे चित्र आहे. असे असतानाच भिवंडीतील एका गोदामामध्ये परदेशात वापरलेल्या मास्कची धुवून वाढीव दराने विक्री केली जात असल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. या वृत्तामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित गोदामातील मास्कची नुकतीच पाहाणी केली. मात्र, या तपासणीदरम्यान समाज माध्यमांवरील वृत्तात म्हटल्याप्रमाणे पोलिसांना तसे काहीच दिसून आले नाही. असे असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी गोदामातील मास्कची तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी पोलीस उपायुक्त शिंदे यांनी जिल्हा आरोग्य विभागासह अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना केली असून, या कारवाईसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भिवंडीतील एका गोदामामध्ये परदेशात वापरलेल्या मास्कची धुवून वाढीव दराने विक्री केली जात असल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी नुकतीच गोदामाची पाहाणी करण्यात आली. मात्र, तिथे तसे काहीच आढळून आलेले नाही. असे असले तरी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाला याबाबत तपासणी करून या प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी पत्र पाठविले आहे.
– राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, भिवंडी