|| नीलेश पानमंद
बदलत्या राजकीय समीकरणामुळे निवडणुकीत रंगत:- भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघावर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे वर्षांनुवर्षे वर्चस्व होते. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने हा मतदारसंघ काबीज केल्यानंतर महापालिका निवडणुकीत चित्र बदलेल अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. मुस्लीमबहुल असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसचे २३ नगरसेवक निवडून आले. लोकसभा निवडणुकीत येथून काँग्रेसला मताधिक्य मिळाले असले तरी अपेक्षित मतांचा टप्पा पार करता आला नव्हता. गेल्या पाच वर्षांतील बदलत्या राजकीय समीकरणामुळे यंदाची निवडणूक चुरशीची झाली असून त्यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या मतदारसंघामध्ये ५५ ते ६० टक्क्याच्या आसपास मुस्लीम समाज आहे. तर उर्वरित ४५ ते ४० टक्के आगरी, जैन, मारवाडी, तेलगु आणि उत्तर भारतीय समाज आहे. भिवंडीसाठी यापुर्वी एकच विधानसभा मतदारसंघ होता. त्या वेळेस या मतदारसंघावर काँग्रेसचा वरचष्मा होता. मात्र, २००९ मध्ये झालेल्या नव्या रचनेत भिवंडी पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे अब्दुल रशीद ताहीर मोमीन हे विजयी झाले होते. मुस्लीमबहुल असलेल्या या मतदारसंघामध्ये एकेकाळी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे वर्चस्व होते. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार महेश चौघुले यांनी हा गड काबीज केला. या निवडणुकीत दोन्ही पक्षांची पिछेहाट झाल्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र भाजपचा दारुण पराभव झाला. या मतदारसंघातून मुस्लीम मतदारांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळाली आणि त्यामुळे या भागातून काँग्रेसचे २३ नगरसेवक निवडून आले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने भिवंडीत बरेच दौरे झाले होते. त्याचाही फायदा काँग्रेसला महापालिका निवडणुकीत झाला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना भिवंडी पश्चिमेतून २५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
कपडा निर्मिती करणारे हातमाग आणि यंत्रमाग कारखाने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात असून भागातील ४० टक्के कारखाने बंद झाले आहेत. हे कामगार मूळ गावाी परतल्याने या मतदारांच्या संख्येत घट झाल्याने त्याचा फटका नेमका कोणत्या पक्षाला बसतो, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मोहमद खालीद मुक्तार अहमद शेख यांनी बंडखोरी केली असून ते एमआयएम पुरस्कृत उमेदवार आहेत. तसेच वंचित आघाडीतर्फेही उमेदवार उभा आहे. भाजपचे उमेदवार महेश चौघुले विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार मोहमद शोएब अशपाक खान अशी लढत होणार आहे.
एकूण मतदार
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख ७२ हजार ७२२ मतदार आहेत. त्यामध्ये एक लाख ६३ हजार ४६४ स्त्री, एक लाख ९ हजार १८८ पुरुष आणि ७० तृतीयपंथी मतदार आहेत.
मतदारसंघ हद्द
भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये महापालिका क्षेत्रातील १ ते ५, १८ ते ३५, ५१ ते ६१ आणि भिवंडी तालुक्यातील खोणी, शेलार, काटई आणि कारिवली या गावांचा समावेश आहे.