छुप्या युतीचा दाखला देत खोचक सल्ले
मुरबाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती झाली असली तरी येथे आधीपासूनच आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची छुपी युती होती. मला त्याबाबत कल्पना होती, असेच सांगत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांना प्रचारसभेत जोरदार चिमटे काढले.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा निवडणूक लढवणारे भाजपचे किसन कथोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमोद हिंदुराव यांच्यात थेट लढत आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये युती नसल्याने भाजपच्या किसन कथोरे यांच्यासमोर शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांचे थेट आव्हान होते. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी किसन कथोरे आणि वामन म्हात्रे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रचारात उडी घेत भाजपचा प्रचार केला होता. त्यामुळे सेना-भाजपत मोठी लढाई झाली होती. त्यानंतरही कुळगाव बदलापूर नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात गेली. पालिका निवडणुकीनंतर चार वर्षे शिवसेना आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नव्हता. पालिका कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत अनेकदा वामन म्हात्रे यांनी किसन कथोरे यांना लक्ष्य केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधीपासून या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा शहरात आहे. शिवसेनेच्या मॅरेथॉन स्पर्धेत किसन कथोरे यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेत धाव घेतली होती. या पाश्र्वभूमीवर बदलापुरात प्रचारासाठी आलेल्या पालकमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना टोले लगाविले.
गौरी हॉल येथे झालेल्या युतीच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी, बदलापुरात गेल्या काही वर्षांत युती नव्हती. तरी म्हात्रे आणि कथोरेंची छुपी युती होती. महत्त्वाचे निर्णय घेताना या दोघांमध्ये चर्चा व्हायच्या. याबाबत मला कल्पना आहे, असा टोला शिंदे यांनी या वेळी लगाविला. छुपी युती आता मजबूत झाल्याने सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचा विक्रम त्यांनी करावा असे आवाहन या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना केले.