|| भगवान मंडलिक

स्वतंत्र नगरपालिका न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी:- कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. प्रत्यक्षात मागील साडेतीन वर्षांत ही गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात आलेली नाहीत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मुद्दा पेटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोदी लाटेत हा मुद्दा निष्प्रभ ठरल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारांच्या प्रचारात तो केंद्रस्थानी येऊ लागला आहे.

‘२७ गावांतील तुमची ताकद दाखवून द्या. तत्काळ तुम्हाला तुमच्या मनासारखा निर्णय देतो’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कल्याण -डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी प्रीमिअर मैदानावर आयोजित जाहीर सभेत सांगितले होते. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शिवसेनेच्या एकहाती वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपने २७ गावांमधील संघर्ष समितीच्या नेत्यांना हाताशी धरले होते. महापालिका हद्दीतून ही गावे वगळली जातील आणि तेथे स्वतंत्र नगरपालिका करू, असे आश्वासनही या वेळी भाजप नेत्यांनी संघर्ष समितीच्या नेत्यांना दिले होते. प्रत्यक्षात मात्र या आघाडीवर गेल्या पाच वर्षांत फार काही झालेले नाही.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात मात्र मोदी लाटेमुळे या मुद्दय़ाचा काहीही परिणाम निवडणूक निकालावर दिसला नाही. असे असताना विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेविरोधात हा मुद्दा पेटविण्याचा प्रयत्न केला जात असून संघर्ष समितीकडून मनसेला पाठिंबा दिला जात असल्याने निवडणुकीत रंग भरू लागले आहेत.

आघाडीचे मनसेला समर्थन

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एका जाहीर कार्यक्रमात मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना समर्थन देत असल्याचे जाहीर केले. युतीच्या उमेदवाराला शह देण्यासाठी या वेळी काँग्रेस आघाडीने ग्रामीणमध्ये उमेदवार दिला नाही.  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी ग्रामीण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वंडार पाटील यांना १९ हजार ७८३ मते मिळाली होती. काँग्रेसच्या शारदा पाटील यांना ९ हजार २१३ मते मिळाली होती. मनसेचे त्या वेळचे उमेदवार रमेश पाटील यांना ३९ हजार ८९८ मते मिळाली होती.

२७ गावांची नगरपालिका, ग्रोथ सेंटर, विकासकामे विषयावर भाजप, शिवसेना नेत्यांनी ग्रामस्थांना फसवले आहे. २७ गावांमध्ये या दोन्ही पक्षांविषयी घराघरांत तीव्र रोष आहे. युतीच्या उमेदवाराला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. संघर्ष समितीने अद्याप कोणाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला नाही. दोन दिवसांत निर्णय होईल. -चंद्रकांत पाटील, सरचिटणीस, संघर्ष समिती

निवडणुकीनंतर नगरपालिका राज्यमंत्री रवींद्र चव्हाणविधानसभा निवडणूकझाली की तात्काळ २७ गावची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे राज्यमंत्री रवींद्र चव्हाणयांनी सांगितले. कल्याण ग्रामीण मधील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. गावांच्या सर्वागीण विकासासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. जे हवे ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

(कळते समजते..)

माणसांची नाही, विकासाची उंची वाढवा..

सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत असून विविध राजकीय पक्षांकडून निरनिराळ्या प्रकारे प्रचार होताना दिसून येत आहे. शिवसेनेकडून कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातही असाच निराळा प्रचार होत असून मतदारांकडून मात्र याविषयी खिल्ली उडवली जात असल्याचे दिसून आले आहे. सर्कशीत असतात तशी दोन उंच माणसे ही हाती एकनाथ शिंदे यांचे फलक घेऊन कोपरी भागात फेरफटका मारून मतदारांना एकनाथ शिंदे यांनाच मतदान करा, असे आवाहन करत होते. ही दोन उंच माणसे कोपरीतील अष्टविनायक चौकात आल्यानंतर या ठिकाणी बसलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी या सर्कशीतल्या दोन उंच माणसांची चांगलीच खिल्ली उडवली. कट्टय़ावर बसलेले एक आजोबा त्या दोन उंच माणसांना थांबवून म्हणाले, ‘‘अरे बाबा, कोपरीत वीज, पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने हाल सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत आणि त्याही अगोदर तुझ्या साहेबांनी काहीच केलं नाही. आला आहे तसाच परत जा आणि सांग तुझ्या साहेबांना की, प्रचारासाठी माणसांची उंची वाढवून फायदा नाही, तर विकासाची उंची वाढवायला हवी,’’ असे बोलताच आजोबांना आलेला राग पाहून त्या दोन सर्कशीतल्या प्रचारकांनी त्या ठिकाणाहून पळ काढला..

कोणती निशाणी घेऊ हाती..

गेल्या काही दिवसांपूर्वी वागळे इस्टेट येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती झाल्याने शिवसेनेसह काही भाजपचे नेते आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. सभागृहाच्या बाहेर एका टेबलावर शिवसेना पक्षाची निशाणी असलेल्या गळ्यात घालण्याच्या पट्टय़ांचा संच त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. तिथेच बाजूला भाजप पक्षाची निशाणी असलेल्या पट्टय़ांचा संचही ठेवण्यात आला होता. मात्र काही कारणामुळे शिवसेनेच्या आणि भाजपच्या त्या दोन्ही पट्टय़ांची सरमिसळ झाली होती. त्यामुळे सभेसाठी उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांना टेबलावर ठेवलेल्या दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या पट्टय़ा निवडून घ्याव्या लागत होत्या. सरमिसळ झालेल्या पट्टय़ांमधून आपल्या पक्षाची पट्टी शोधून काढणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये ‘कोणती निशाणी घेऊ हाती’ असाच काहीसा सूर होता.

संकलन- ऋषिकेश मुळे