अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या डॉ. बालाजी किणीकर यांनी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली आहे. त्यांनी काँग्रेसच्या रोहित साळवे यांचा २९ हजार २९४ मतांनी पराभव केला आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून निवडून येताना त्यांनी ६० हजार ०८३ मते मिळवली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत युती असूनही त्यांना ८८ हजार ८१० मतांचा आकडा गाठण्यात अपयश आले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही १६ हजार मते घेतली आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या डॉ. बालाजी किणीकर हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या रोहित साळवे यांचे आव्हान होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही अर्ज भरल्याने आणि प्रचारात आघाडी घेण्यात अपयश आल्याने काँग्रेसच्या विजयाबाबत साशंकता होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह काँग्रेस उमेदवाराच्या आधी होते. त्यामुळे प्रचार न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण खरात यांना ३ हजार ३२३ मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवार रोहित साळवे यांना ३० हजार ७८९ मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाबाजी पाटील यांना ३१ हजार १४३ मते मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकूण मतांचा आकडा वाढला आहे. तर लोकसभा निवडणुकीत १६ हजार ९०० मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या धनंजय सुर्वे यांनीही १६ हजार २७४ मते मिळवली आहेत. मनसेचे सुमेध भवार यांना १३ हजार ३६५ मते मिळाली आहेत. सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या शिवसेना, भाजप युतीच्या डॉ. बालाजी किणीकर यांना ६० हजार ०८३ मते मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत डॉ. किणीकरांचा अवघ्या २०४१ मतांनी विजय झाला होता. त्या वेळी भाजपच्याच राजेश वानखेडे यांनी डॉ. किणीकरांना कडवी झुंज दिली होती. युतीमुळे डॉ. किणीकर यांचा विजय सोपा झाल्याचे बोलले जाते. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतांचा फटका काँग्रेसला बसल्याचे बोलले जाते. डॉ. किणीकर यांचा विजय झाला असला तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळालेल्या ८८ हजार ८१० मतांचा पल्ला गाठणे डॉ. किणीकर यांना यंदा शक्य झाले नाही. त्यामुळे भाजपने प्रचारात उतरण्याचे टाळल्याने मताधिक्य घटल्याची चर्चा आहे.