निवडून आल्यास प्रभागातील रस्ते चकाचक करू, उद्याने सुशोभीत करू अशा नागरी सुविधांच्या आश्वासनांची खरात प्रत्येक उमेदवार करतच असतो. त्यापैकी कोणती व किती आश्वासने पूर्ण होतात, हा संशोधनाचा विषय असला तरी, अंबरनाथमध्ये आता मतदारच उमेदवारांशी नागरी सुविधांसाठी सौदा करू लागल्याची चर्चा सुरू आहे. आपल्या गृहनिर्माण सोसायटीसाठी किंवा आसपासच्या परिसरातील कामे मार्गी लावून दिल्यास मतदान करू, अशा ‘ऑफर’च पांढरपेशा मतदारांकडून दिल्या जात असून उमेदवारही सोसायटीच्या सदस्यांना निवडणुकीनंतरच्या तारखेचे धनादेश वाटत असल्याची धक्कादायक माहिती हाती येत आहे.
निवडणूक काळात दाखवली जाणारी प्रलोभने तसेच पैशांचे वाटप हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. विशेषत: झोपडपट्टी किंवा आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या भागातील मतदारांना पैसे किंवा वस्तूंचे लालूच दाखवून त्यांची मते खरेदी करण्याचे प्रकार घडतच असतात. मात्र, आता मोठमोठय़ा गृहनिर्माण संस्था आणि गृहसंकुलांतील मतदारही आपल्या मतांचे सौदे उमेदवारांशी करू लागल्याचे आढळून आले आहे. रस्ते, पायवाटा, अपुरा पाणीपुरवठा आदी पालिका प्रशासनाशी संबंधित सुविधा पुरविण्याच्या हमीबरोबरच इमारतीला रंगरंगोटी करणे, नादुरुस्त पाण्याची टाकी नव्याने बांधून देणे, छताचे वॉटर प्रूफिंग करणे आदी प्रकारच्या कामांसाठी निधी देणाऱ्या उमेदवारांना सोसायटीची एकगठ्ठा मते देण्याचे आमिष दाखवले जात आहे. मिळू शकणाऱ्या मतांचा अंदाज करून उमेदवारही सोसायटीच्या सभासदांना त्यांचे काम करण्याचे आश्वासन देत आहेत. काहींनी तर त्या कामासाठी पुढील तारखेचे धनादेशही देऊ केले आहेत. उमेदवाराशी विशेष लगट असणाऱ्या सोसायटी सभासदांकरवी एकगठ्ठा मतांचे अशा प्रकारे फिक्सिंग केले जाऊ लागले आहे. पालिका निवडणुकीत उमेदवाराला नियमानुसार तीन लाख रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. प्रत्यक्षात अनेक उमेदवारांचा खर्च १५ ते २० लाख रुपयांच्या घरात जातो. प्रचार कार्यालय, तिथे दररोज उपस्थित राहणारे कार्यकर्ते आणि पाठीराख्यांसाठी बराच खर्च करावा लागतो. पुन्हा इतके पैसे मोजूनही पुरेशी मते मिळतीलच याची शाश्वती नसते. त्यापेक्षा प्रभागातील काही प्रमुख सोसायटीच्या सभासदांना गाठून त्यांची कामे करण्याच्या बदल्यात एकगठ्ठा मते मिळविणे उमेदवारांसाठी सोयीचे ठरते. त्यामुळे शे-दीडशे मतांसाठी लाख-दीड लाख रुपये खर्च करायला उमेदवार तयार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातील निरीक्षकांनी दिली.
संकेत सबनीस, अंबरनाथ