मतदारांची माहिती फुटली?

दाखाल येथील अमित रॉड्रिक्स आणि त्यांच्या बहिणीला असाच अनुभव आला.

प्रतिनिधिक छायाचित्र

पदवीधर मतदारसंघासाठीचे नोंदणी अर्ज
तहसीलदार कार्यालयातून राजकीय व्यक्तींना माहिती पुरविल्याचा संघटनेचा आरोप

पदवीधर मतदारसघांसाठी तहसील कार्यालयात अर्ज सादर केलेल्या मतदारांची वैयक्तिक माहिती राजकीय पक्षांकडे गेल्याचा धक्कादायक प्रकार वसईत उघडकीस आला आहे. अर्जदारांनी भरलेली माहिती गोपनीय असताना ती बाहेर गेलीच कशी, असा सवाल स्वाभिमानी वसईकर संघटनेने करून या प्रकरणी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

सध्या पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू आहे. ऑक्टोबर २०१७ पासून तहसीलदार कार्यालयात अर्जदारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. या अर्जात उमेदवारांच्या नाव, पत्त्यासह मोबाइल क्रमांक आणि ई-मेल यांचा समावेश असतो. पदवीधर मतदारांना अर्ज क्रमांक १८ भरावा लागतो. या अर्जाची तहसीलदार कार्यालयात छाननी केल्यानंत तो स्वीकारला वा रद्दबातल केला जातो. अर्जदाराने सादर केलेली माहिती गोपनीय असते. परंतु ती आतापासून राजकीय पक्षांकडे गेल्याचा धक्कादायक आरोप स्वाभिमानी वसईकर संघटनेने केला आहे. संघटनेचे अध्यक्ष रॉजर रॉड्रिग्ज यांनी याबाबत मुख्य निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

नंदाखाल येथील अमित रॉड्रिक्स आणि त्यांच्या बहिणीला असाच अनुभव आला. आम्ही अर्ज भरला आणि आम्हाला एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातून पत्ता पडताळणीसाठी फोन आला. त्यानंतर सणाला या पक्षाच्या संभाव्य उमेदवाराचे लघुसंदेश (एसएमएस) येत आहेत, असे ते म्हणाले. आम्ही पहिल्यांदाच अर्ज भरला आहे. मग आमचे मोबाइल क्रमांक कसे गेले, असा सवाल त्यांनी केला आहे. माझ्याबरोबर अर्ज भरलेल्या अनेकांना अशाच प्रकारे राजकीय पक्षाच्या संभाव्य उमेदवाराचे संदेश आणि फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले.कोकण पदवीधर मतदारसघांसाठी तालुक्यानुसार मतदार नोंदणी होत आहे. पालघर, ठाणे आणि रायगड हे जिल्हे कोकण पदवीधर मतदारसंघात आहेत.

तालुक्यानुसार पदवीधर मतदार नोंदवले जातात. वसई तालुक्यातून सध्या नऊ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी झालेली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी मे महिन्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. तोवर ही मतदार नोंदणी सुरू राहणार आहे. माहिती बाहेर जाऊ  लागल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नव्या मतदारांची माहिती फुटलीच कशी?

वसई तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकारी मनीषा पिंपळे यांनी माहिती चोरीला जात असल्याच्या  आरोपाचा इन्कार केला. आम्ही अर्जदाराचा अर्ज स्वीकारल्यानंतर संगणकात नोंदणी करतो आणि अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवतो. दोन्ही ठिकाणांहून माहिती बाहेर जाऊ  शकत नाही, असा दावा त्यांनी केला. राजकीय पक्षांकडे जुनी यादी असेल आणि त्यांनी त्यानुसार मतदारांना संपर्क केला असेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. परंतु ज्या मतदारांनी पहिल्यांदाच नाव नोंदणी केली त्यांची माहिती राजकीय पक्षांकडे कशी पोहोचली, याबाबत त्या माहिती देऊ  शकल्या नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Voters information leaked in vasai

ताज्या बातम्या