शिवसेना- भाजपमधील वाकयुद्धामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या राजकीय समिकरणांचे अंदाज बांधण्यासाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरू शकणाऱया कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठीचे मतदान रविवारी साडेपाच वाजता संपले. हाती आलेल्या आकडेवारीनुसार कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४५ टक्क्यांपर्यंतच मतदान झाले आहे. त्यामुळे अपेक्षित मतदान न झाल्याने राजकीय पक्षांच्या चिंता वाढल्या आहेत. आता उद्या मतमोजणीत मतदार राजाचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
सत्ताधाऱयांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळच्या सत्रात १८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. एखाद दुसरा कार्यकर्त्यांमधील बाचाबाचीचा प्रकार वगळता सकाळच्या सत्रात कल्याण-डोंबिवलीत सुरळीत मतदान झाले. मात्र, दुपारी डोंबिवलीत एका वॉर्डात मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रुपांत हाणामारीत झाले. या हाणामारीत चक्क चाकू-तलवारींचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे. हाणामारीत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्वरित घटनास्थळाचा ताबा घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. याप्रकरणी एकाला अटक केल्याचेही समजते.
दरम्यान, सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली नाही. दुपारच्या सत्रात मतदान केंद्रांबाहेर तुरळक गर्दी दिसून आली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच्या कल्याण-डोंबिवलीत ३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तरुणांमध्येही मतदानाचा उत्साह दिसून आला. तरुणाईचे मतदान केल्यानंतरचे सेल्फी सोशल मीडियावर झळकले. मतदानासोबत सकाळी काही तक्रारींनाही जोर आला होता. एका वर्तमानपत्र विक्रेत्या स्टॉलवर वर्तमानपत्रांमध्ये भाजपची प्रचारपत्रकं आढळून आल्याने वाद निर्माण झाला होता. भाजपने प्रचारपत्रक वाटून आचारसंहितेच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेने केला. हा पेपरस्टॉल तात्काळ बंद करण्यात आला मात्र, याप्रकाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदविण्याचा पवित्रा सेना नेत्यांनी घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2015 रोजी प्रकाशित
डोंबिवलीत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, सुमारे ४५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज
मतदारांमध्ये उत्साह असून सत्ताधाऱयांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 01-11-2015 at 10:49 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting begins in kalyan dombivili and kolhapur