वसई-विरारसाठी २५ नवीन रुग्णवाहिका, परिवहनच्या बसचा वापर, स्वतंत्र नियंत्रण कक्ष

वसई : करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांची असलेली कमतरता आणि खाजगी रुग्णावाहिकांकडून होणारी लूट रोखण्यासाठी पालिकेने आता प्रथमच रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय पालिका नवीन २५ रुग्णावाहिका आणणार असून पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेसचा वापरही रुग्णांची ने-आण करण्यासाठी होणार आहे.

वसई विरार शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसाला सरासरी सव्वाशे नवीन करोना सकारात्मक रुग्ण आढळून येत आहेत. एक रुग्ण आढळला की, त्याला रुग्णालयात नेणे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अलगीकरणात नेणे तसेच रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते.

सध्या शहरात पालिकेच्या केवळ २० रुग्णवाहिका आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना रुग्णवाहिकेची वाट बघत तासन्तास ताटकळत रहावे लागते. परिणामी त्यांना वेळेवर उपचारही मिळत नाहीत. दुसरीकडे खाजगी रुग्णवाहिका अवाच्या सवा भाडे आकारत आहेत. अगदी पीपीई किटचा खर्चही रुग्णाकडून घेतला जात आहे. याची दखल पालिकेने घेतली असून त्यांनी २५ रुग्णवाहिका घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

याशिवाय पालिकेने नागरिकांना रुग्णावाहिक वेळेवर मिळाव्या यासाठी खास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. अशा प्रकारे रुग्णवाहिकेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणारी वसई विरार ही पहिली महापालिका ठरली आहे. याशिवाय जितेंद्र मुकणे  यांची रुग्णवाहिका समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेत. नागरिक रुग्णवाहिका नियंत्रक चंद्रकांत भोजने- ७२१८९८७९५६, सूरज पांडे- ९३७३५७३९९५ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

परिवहन सेवेच्या बसेसचा वापर करणार

सध्या शहरातील परिवहन सेवा बंद आहे. त्यामुळे या परिवहन सेवेच्या बसेसचा वापर रुग्णांची ने-आण करण्यासाठी केला जाणार आहे, असे पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले. रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचणे गरजेचे आहे. शहराच्या विविध भागात रुग्णालये, कोव्हीड उपचार केंद्रे आहेत. त्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

रुग्णवाहिकेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

वसई : करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून ने-आण करण्यासाठी पालिकेने रुग्णालय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी या नियंत्रण कक्षावर संपर्क केल्यास त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होऊ  शकणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत आहे. खाजगी रुग्णवाहिका चालक अवाच्या सवा भाडे आकारून रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे पालिकेने आता खास रुग्णवाहिका कक्ष स्थापन केला आहे. पालिकेच्या मुख्यालयातील तळमजल्यावर हा रुग्णवाहिका कक्ष असून त्याचा संपर्क क्रमांक ८५३०८२३१७० असा आहे. याशिवाय जितेंद्र मुकणे- (८८०६५३६३३६) यांची रुग्णवाहिका समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या शहरात २० रुग्णवाहिका असून आणखी २५ रुग्णवाहिका दाखल केल्या जाणार आहेत. त्याशिवाय परिवहन सेवेच्या बसेसचाही वापर होणार आहे. नागरिकांनी रुग्णावाहिकेसाठी नियंत्रण कक्षात संपर्क साधावा. रुग्णवाहिकाअभावी कुणाचीही गैरसोय होणार नाही.

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई विरार महापालिका