बदलापुरात शस्त्रक्रिया विभागाची उभारणी रखडलेलीच

भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे राहील, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतरही नगरपालिकांना श्वानांच्या निर्बीजीकरणाबाबत गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. नऊ  महिने उलटूनही निर्बीजीकरण करण्यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया विभाग उभारला गेला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढतच आहे.

बदलापूर शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे. भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे. मात्र कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या वतीने निर्बीजीकरण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही. भटक्या श्वानांनी चावा घेतल्याने जीवितहानी झाल्यास किंवा आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल, असे यापूर्वी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अंबरनाथमधील एका प्रकरणानंतर मानवाधिकार आयोगानेही याची दखल घेतली होती. त्या वेळी उल्हासनगर, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिका यांना यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्या वेळी पालिकेने तडकाफडकी निर्णय घेत या संदर्भातल्या निविदा जाहीर केल्या. त्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र सुरुवातीच्या काळात संस्थांकडून प्रतिसाद  मिळाल्याने ही प्रक्रिया रेंगाळली होती. मात्र त्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन्ही शहरांमध्ये संस्था पुढे आल्याने निर्बीजीकरण केंद्राची निर्मिती करण्याच्या कामाला वेग येईल, अशी आशा होती.

कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात या कार्यक्रमाला नऊ  महिन्यांनंतरही मुहूर्त मिळाला नाही. निर्बीजीकरण करण्यासाठी आवश्यक असलेला शस्त्रक्रिया विभाग पालिकेने उभारायचा आहे. मात्र त्यासाठी अद्याप योग्य जागा निवडली गेली नसल्याने हे काम रखडल्याची माहिती मिळत आहे. निर्बीजीकरण केंद्राची निर्मिती करण्यासाठी शस्त्रक्रिया विभाग आणि शस्त्रक्रियेनंतर भटक्या श्वानांना विश्रांतीसाठी जागा आवश्यक असते. मात्र या जागेला शहरातील विविध भागांत विरोध केला गेला. त्यानंतर आता कात्रपजवळच्या डोंगर भागात असलेल्या मोहपाडा येथे हे केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप त्याची कोणतीही सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे निर्बीजीकरण केंद्राची निर्मिती करण्याचा  कार्यक्रम अजूनही सुरू झालेला नाही, अशी माहिती पुढे आली आहे.